आयसीसीने पुरुषांची टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर- १२ टप्पा सुरू होण्यापूर्वीच जाहीर केलेल्या क्रमवारीत बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार शाकीब अल हसनला खूप मोठा फायदा झाला. अष्टपैलू क्रमवारीमध्ये बांग्लादेशच्या शाकीब अल् हसनने पुन्हा एकदा पहिलं स्थान मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियातील बांग्लादेशच्या टी२० विश्वचषकाच्या मोहिमेपूर्वी शाकीबचा हा फॉर्म संघाला नक्कीच फायदेशीर ठरेल. त्याने अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीला मागे टाकले आहे.

टीम इंडियाचा विचार करता स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानी कायम असून विश्वचषकानंतर तो नक्कीच पहिलं स्थान मिळवू शकतो. पहिल्या स्थानाचा विचार करता पाकिस्तानता मोहम्मद रिझवान नंबर १ वर असून गोलंदाजांमध्ये जोश हेझलवुड विराजमान आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कोणताही बदल झालेला नसून पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवानने भारताच्या सूर्यकुमार यादवच्या तुलनेत आपले स्थान मजबूत केले आहे. रिझवानला तिरंगी मालिकेतील कामगिरीचा फायदा झाला आणि आता त्याचे ८६१ रेटिंग गुण आहेत, सुर्यकुमार यादवने २३ गुणांची कमाई करत ८३८ गुण खात्यात जमा केले तर बाबर आझम ८०८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अव्वल १० च्या क्रमवारीत फक्त एक बदल झाला असून न्यूझीलंडचा स्टार फलंदाज ग्लेन फिलिप्स १३ स्थानांनी झेप घेत १० व्या स्थानावर पोहोचला आहे.

अष्टपैलूंच्या क्रमवारीत नामिबियाच्या जेजे स्मितला चार स्थानांचा फायदा झाला असून तो चौथ्या स्थानावर गेला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात स्मितने शानदार प्रदर्शन केले होते. दुसरीकडे, झिम्बाब्वेचा अनुभवी सिकंदर रझालाही चार स्थानांचा फायदा झाला असून तो आता सातव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहामध्ये गोलंदाजांच्या क्रमवारीतही काही बदल करण्यात आले आहेत. अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब-उर-रहमान दोन स्थानांनी पुढे पाचव्या तर दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड ७०५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.