पाकिस्तानी संघाने टी २० विश्वचषकामध्ये वेस्ट इंडीजविरोधात आपला पहिला सराव सामना काल खेळला. या सामन्यामध्ये मागील बऱ्याच काळापासून चांगली खेळी करण्यात अपयश आलेला ख्रिस गेल कसा खेळणार याकडे अनेकांचं लक्ष होतं. ४२ वर्षीय गेल मागील मोठ्या कालावधीपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. त्यामुळेच तो कालही फलंदाजी करताना त्याच्या नेहमीच्या शैलीत न दिसता थोडा गोंधळल्यासारखा वाटला. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी खेळाडूंनी गेल खेळत असतानाच त्याच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी केलेली वक्तव्यं स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालीयत.

गेल फलंदाजी करत असताना पाकिस्तानी विकेटकीपर मोहम्मद रिजवान आणि गोलंदाज शादाबमधील हिंदीमधील चर्चा स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड झालीय. शादाबने गेल गोंधळत असल्याचं पाहिल्यानंतर त्याने गेल तणावाखाली खेळत असल्याचं आपल्या सहकाऱ्याला सांगितलं. गोलंदाज विकेटकीपरला म्हणतो की गेल थोडा तणावामध्ये आहे. विकेटकीपर रिझवान गोलंदाजाच्या वक्तव्याशी सहमती दर्शवत गेल घाबरल्यासारखा वाटतोय, असं म्हणतो. तसेच गेल बिचकत बिचकतच आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही विकेटकीपर मिळतो.

आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी जगभरात ओळखला जाणाऱ्या गेलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ३० चेंडूंमध्ये दोन चौकारांच्या मदतीने २० धावा केल्या.

या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ७ गड्यांच्या मोबदल्यात १३० धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक म्हणजेच २८ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रीदी, हसन अली आणि हारिस रौफने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानने तीन गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या यशस्वीपणे गाठली. २७ चेंडू शिल्लक असतानाच पाकिस्तानने हा सामना सात गडी राखत जिंकला.