भारताला सध्याच्या घडीला खेळाडूंची जेवढी चिंता वाटत नसावी तेवढी खेळपट्टीची वाटू लागली आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती, म्हणून क्युरेटर सुधीर नाईक यांना अपशब्द वापरून झाले. पुण्याच्या गहुंजेची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला मदत करणारी होती, त्या वेळी श्रीलंकेच्या युवा गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना स्वस्ता गुंडाळले. जामठावर फिरकीचा आखाडा बनवला तर तिथेही लाजिरवाणा पराभव पदरी पडला, त्यामुळे भारतीय संघाला खेळपट्टी नेमकी कशी हवी, हे अनाकलनीयच आहे.
नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेला जामठय़ाच्या मैदानात आपण फिरकीच्या जोरावर लोटांगण घालायला लावले. त्या वेळी आयसीसीने खेळपट्टीबाबत चिंता व्यक्त करत ताकीद दिली होती, पण भारतीय खेळाडू विजयात मश्गूल असताना खेळपट्टीची पाठराखण करत होते; पण याच हव्याहव्याशा वाटणाऱ्या खेळपट्टीवर त्यांचे पानिपत झाले.
भारताचे फलंदाज फिरकीचा उत्तमपणे सामना करतात, हे काही दिवसांपूर्वी म्हटले जायचे खरे, पण गेल्या काही वर्षभरात तसे दिसत तर नाही. याच सामन्याचा विचार करा. मिचेल सँटर आणि इश सोढी हे काही नावलौकिक मिळालेले फिरकीपटू नाहीत किंवा त्यांचा चेंडू हातभर वळतो असेही नाही; पण तरीदेखील या दोघांनी भारताला फिरकीच्या जोरावर नाचवले की भारतीय फलंदाज नाचले, हा मोठा प्रश्न आहे. या सामन्यात विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांचा अपवाद वगळता, कोणताही फलंदाज फिरकीचा सामना करताना दिसले नाही. या फलंदाजांच्या तंत्रावर भाष्य करणे चुकीचे ठरेल. तसे धोनीकडेही फलंदाजीचे तंत्र नाही, अशी ओरड होतेच; पण तरीही धोनी बऱ्यापैकी खेळला तो मानसिकतेच्या जोरावर. फक्त मोठे फटके आणि तेदेखील हवेतून मारण्यातच भारतीय फलंदाज मश्गूल असताना दिसतात. न्यूझीलंडविरुद्ध भारताला काही २५० धावांची गरज नव्हती. चेंडूमागे एकेरी धावेचीच गरज होती. त्यासाठी खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहणे गरजेचे असते, एवढी साधी गोष्ट त्यांना कळू नये. क्रिकेटच्या नर्सरीमध्येच या गोष्टी शिकवल्या जातात. त्याचा विसर त्यांना पडलेला दिसतो. ट्वेन्टी-२० क्रिकेट हे फक्त हाणामारीसाठीच असते, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये एकेरी धाव घेणे अपमानास्पद नसल्याचे त्यांना कुणीतरी सांगायला हवे.
जामठाच्या खेळपट्टीमुळे भारताचा पराभव झाला, हे पचनी पडणारे नाही. न्यूझीलंडचा पराभव झाला असता तर असे कुणी म्हटले असते का? भारताचे फलंदाज हेच पराभवाचे धनी आहेत. हा पराभव म्हणजे फलंदाजांनी पायावर मारलेला धोंडा आहे. या खेळपट्टीवर जर तुम्हाला माफक धावांचे आव्हान झेपत नसेल, तर सारेच कठीण आहे.
न्यूझीलंडचे नवखे फिरकीपटू तुम्हाला चकित करत असतील तर अव्वल फिरकीपटूंपुढे कसा निभाव लागेल, हे सांगणेच न बरे; पण हा पराभव विसरून भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज होणे क्रमप्राप्त आहे. पाकिस्तानकडे चांगला वेगवान मारा असला तरी त्यांच्याकडे दर्जेदार फिरकीपटूही आहेत. पण एक प्रश्न सारखा सतावतोय, तो म्हणजे भारताला जिंकण्यासाठी खेळपट्टी हवी तरी कशी?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा