सुनील गावस्कर यांचा स्ट्रेट ड्राइव्ह
फिरकी खेळपट्टी म्हणजे भारताच्या विजयाची हमी, असे म्हटले जाते. पण भारताच्या फिरकीचा सोस न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्यांच्याच अंगलट आला, असा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’ भारताचे माजी कर्णधार आणि समाचोलक सुनील गावस्कर यांनी लगावला आहे.
‘‘जर तुम्ही फिरकी खेळपट्टीवर प्रतिस्पध्र्याना पराभूत करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुम्हीही या खेळपट्टीवर पराभूत होऊ शकता. चांगल्या फिरकी माऱ्यापुढे भारताच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. त्यांना समर्थपणे फिरकी गोलंदाजी खेळता आली नाही, हे मान्य करायला हवे. जेव्हा तुम्ही सामना जिंकता तेव्हा मात्र खेळपट्टीवर जास्त भाष्य करत नाही,’’ असे गावस्कर म्हणाले.
नोव्हेंबरमध्ये जामठय़ाच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या खेळपट्टीसाठी ताकीद दिली होती.
अतिआत्मविश्वासाने भारताचा घात
या सामन्यात अतिआत्मविश्वासाने भारताचा घात केला. पण विजयाचे श्रेय न्यूझीलंडच्या संघ व्यवस्थापनाला द्यायला हवे. कारण त्यांनी भारताविरुद्ध तीन फिरकीपटू खेळवण्याचा विचार केला आणि त्यामध्ये ते यशस्वी ठरले.
पाकिस्तानविरुद्ध जिंकणे अनिवार्य
पहिला सामना भारताने गमावला आहे. भारताचा पुढील सामना पाकिस्तानविरुद्ध असणार असून त्यांना हा सामना जिंकणे अनिवार्यच असेल. भारताने जर हा सामना गमावला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.