‘‘तीन फिरकीपटूंसह खेळण्याचा निर्णय निवड समितीचा होता. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी नऊ बळी घेत हा निर्णय सार्थ ठरवला,’’ असे न्यूझीलंडचा उदयोन्मुख फिरकीपटू मिचेल सँटनरने सांगितले. या सामन्यात सँटनरने ११ धावांत ४ बळी घेतले, तर इश सोधीने १८ धावांत ३ आणि नॅथन मॅक्क्युलमने १५ धावांत २ बळी घेतले.
वेगवान गोलंदाजी हा न्यूझीलंडचा कणा. मात्र नागपुरातील जामठाची खेळपट्टी पाहून न्यूझीलंडने तीन प्रमुख वेगवान गोलंदाजांना विश्रांती देऊन तीन फिरकीपटूंना खेळवण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर न्यूझीलंडचा संघ जाहीर झाल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. फिरकीचा सामना करण्यात वाकबगार भारतीय फलंदाजांसमोर या त्रिकुटाचा पाडाव लागणार का, अशा चर्चाना ऊत आला होता. मात्र याच निर्णयाने न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला.
तो पुढे म्हणाला, ‘‘खेळपट्टी पाहिल्यानंतर फिरकीला साथ मिळणार हे स्पष्ट झाले. तिन्ही फिरकीपटूंना खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवला. प्रथम फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात करण्याचा आमचा इरादा होता. मात्र फिरकीपटूंना मदत मिळायला सुरुवात झाली. आमची सुरुवात चांगली झाली असती तर धावसंख्या दीडशेपर्यंत पोहचली असती.’’
‘‘भारताविरुद्ध विजयाने नेहमीच आत्मविश्वास उंचावतो. या सामन्यातून अनेक सकारात्मक गोष्टी मिळाल्या आहेत. भारतीय संघ टक्कर देईल याची खात्री होती. धावसंख्येचा बचाव करताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली, परंतु योजनेनुसार खेळ केल्याने विजय साकारला. विराट कोहली जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याच्या विकेटने सर्वाधिक समाधान दिले,’’ असे सँटनरने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा