न्यूझीलंड गोलंदाजांच्या कौशल्यापेक्षा भारतीय फलंदाजांच्या चुकाच पराभवासाठी कारणीभूत आहेत, असे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले. भारतीय फलंदाजांनी योग्य तंत्रअभावामुळेच बाद झाले. गोलंदाजांच्या प्रयत्नांपेक्षा फलंदाजांनी आपल्या विकेट बहाल केल्या. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी निश्चितच चांगली गोलंदाजी केली. मात्र भारतीय संघ दिमाखात पुनरागमन करेल असा विश्वासही धोनीने व्यक्त केला.
‘‘खेळपट्टीशी जुळवून घेत खेळात योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. भारतीय संघाने वेळोवेळी हे सिद्ध केले आहे. खेळपट्टी संथ होती. गोलंदाजांनी न्यूझीलंडला १२६ धावांमध्ये रोखत चांगली कामगिरी केली. मात्र प्रत्युत्तरादाखल खेळताना नियमित अंतरात विकेट्स गमावल्याने पराभव झाला. आमच्याकडून एकही मोठी भागीदारी झाली नाही. त्यानेच सामन्याचे पारडे फिरले. वेगवान गोलंदाजांना साहाय्यकारी खेळपट्टीपेक्षा फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर खेळणे फलंदाजासांठी कठीण असते. धावा करणे अवघड होते,’’ असे धोनीने सांगितले.
हार्दिक पंडय़ाच्या ऐवजी पवन नेगीला खेळवण्याचा निर्णय योग्य ठरला असता का यावर धोनी म्हणाला, ‘‘युवराज सिंग डावखुरा फिरकीपटू आहे. मात्र त्याने एकही षटक टाकले नाही. कारण डावखुरे गोलंदाज गोलंदाजी करत असताना न्यूझीलंडचे डावखुरे फलंदाज खेळत होते. त्यामुळे युवराजला गोलंदाजी देणे योग्य ठरले नसते.’’
न्यूझीलंडविरूद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानविरूद्धची लढतीत विजय मिळवणे अनिवार्य झाले. यासंदर्भात धोनी म्हणाला, ‘‘प्रत्येक लढतीत जिंकणे क्रमप्राप्त आहे. पाकिस्तानविरूद्धच्या लढतीनंतरही दोन सामने आहेत. भारतात खेळताना
प्रत्येक सामन्यात आमच्यावर दडपण असते.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा