टीम इंडियाचा आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ चा प्रवास ज्या प्रकारे संपला याची कोणालाही अपेक्षा नव्हती. टीम इंडिया उपांत्य फेरीत इंग्लंडकडून १० विकेट्सने पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडली. साखळी टप्प्यात सर्वाधिक ३ सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली. भारताच्या ६ गोलंदाजांना इंग्लंडच्या एका ही फलंदाजालाही बाद करता आले नाही. दरम्यान, आता भारतीय संघाचे ७ खेळाडू ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतणार आहेत, तर उर्वरित न्यूझीलंडला जाणार आहेत.
टी-२०विश्वचषक २०२२ नंतर टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार होती, ज्यासाठी संघाची घोषणा आधीच झाली आहे. बीसीसीआयने काही खेळाडूंना विश्रांती दिली होती, तर २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघातील नऊ खेळाडूंना न्यूझीलंडला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह एकूण ७ खेळाडू भारतात परतणार आहेत.
टी-२० विश्वचषकच्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना गमावल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, सलामीवीर केएल राहुल, यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक, फिरकी गोलंदाज आर अश्विन, अष्टपैलू अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मायदेशी परतणार आहेत. यापैकी दिनेश कार्तिक आणि आर अश्विन यांची आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर टीम इंडियाचा संपूर्ण कोचिंग स्टाफही बदलला जाणार आहे, कारण त्यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण अँड कंपनी न्यूझीलंडला जाणार आहे.
टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ३ सामन्यांची टी-२० मालिका १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे खेळवला जाईल, तर ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका २५ नोव्हेंबरपासून ऑकलंडमध्ये सुरू होईल.
न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ –
हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव., अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन आणि उमरान मलिक.