Team India T20 World Cup 2024 Victory Parade Updates, 4 July 2024 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद जिंकून भारतीय क्रिकेट संघ देशात परतला आहे. सकाळी सहाच्या सुमारास भारतीय खेळाडूंनी देशाच्या भूमीवर पाऊल ठेवले. यानंतर विमानतळावरच संघाच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. खेळाडू बाहेर पडताच संपूर्ण देश भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करत असल्याचे दिसून आले. ढोल-ताशा आणि इतर वाद्यांसह भारतीय संघाचे जंगी स्वागत करण्यात आले. यादरम्यान भारतीय संघ डान्स करतानाही दिसले. आता, मुंबईत भारतीय खेळाडूंची विजयी परेड काढण्यात येणार असून, त्यासाठी खास बस तयार करण्यात आली आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
मुंबईतील विजय परेडसाठी विशेष बस –
मुंबईतील विजय परेडसाठी बीसीसीआयने एक विशेष बस तयार केली असून, ती अतिशय सुंदर दिसत आहे. बसच्या बाजूला टीम इंडियाचे ट्रॉफी घेऊन सेलिब्रेशन करतानाचे मोठे आणि विहंगम फोटो लावण्यात आले आहेत. बस वरून खुली आहे, तिच्यावर स्वार होऊन भारतीय खेळाडू सुमारे दीड किलोमीटरच्या रोड शोमध्ये भाग घेतील आणि संपूर्ण संघ बीसीसीआय कार्यालयात पोहोचेल. या बसचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या रोड शोची मुंबईत जोरदार तयारी सुरू आहे. वानखेडे स्टेडियमपर्यंत खेळाडू ज्या बसमधून विजयी परेड काढणार आहेत, त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बसची झलक आपल्याला आकर्षित करत आहे. भारताचा संपूर्ण विश्वचषक संघ बसमध्ये दिसत आहे. याशिवाय या बसला चॅम्पियन्स २०२४ असे नाव देण्यात आले आहे. बसच्या मागील बाजूस चॅम्पियन्स २०२४ आणि २००७ लिहिलेले आहे. त्यावर बीसीसीआय आणि टी-२० विश्वचषक २०२४ चा लोगो देखील आहे.
हेही वाचा – PM Narendra Modi Meet Team India Live: पंतप्रधान मोदींची भेट घेऊन टीम इंडिया मुंबईकडे रवाना
वानखेडे स्टेडियममध्ये चाहत्यांना मोफत प्रवेश –
भारतीय क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल बीसीसीआयच्या वतीने वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी हजेरी लावावी यासासाठी आज वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनी ही घोषणा केली आहे. स्टेडियममध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर प्रवेश मिळेल.
सायंकाळी ५ वाजता सुरू होणार विजयी परेड –
भारतीय संघाची ही विजयी परेड नरिमन पॉइंट येथून सायंकाळी ५ वाजता काढण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनीही परेड मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्याचवेळी सायंकाळी ७ वाजता वानखेडे स्टेडियमवर सत्कार समारंभ होणार आहे. यामध्ये बीसीसीआय खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्टिंग स्टाफचा सन्मान करणार आहे. या कार्यक्रमाला बीसीसीआयचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.