Gautam Gambhir’s name confirmed for Team India’s coach : टी-२० विश्वचषक २०२४ चा शेवट जवळ येत आहे. त्यामुळे भारताच्या नव्या प्रशिक्षकाबाबतही चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. या विश्वचषकानंतर विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय जोमाने नव्या प्रशिक्षकाचा शोध घेत आहे. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, भारताचा नवा प्रशिक्षक म्हणून माजी डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरचे नाव निश्चित झाले आहे. जूनच्या अखेरीस त्याची औपचारिक घोषणा केली जाईल.
गौतम गंभीर गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये मार्गदर्शक म्हणून उत्तम कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्वाखालीच कोलकाता नाईट रायडर्स यंदाच्या मोसमात चॅम्पियन बनले आहेत. गेल्या वर्षीपर्यंत तो लखनऊ सुपर जायंट्सचा भाग होता. त्यावेळी लखनऊचा संघही गंभीरच्या नेतृत्वाखाली चांगला खेळत होता. त्यामुळेच सध्या भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार गौतम गंभीरने भारताचा मुख्य प्रशिक्षक होण्यास होकार दिला आहे. त्याने बीसीसीआयला कळवले आहे की तो त्यांच्या कोचिंग स्टाफसह काम करायला तयार आहे. सध्या भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आहेत. गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी पारस म्हांबरे यांच्या खांद्यावर आहे. त्याचवेळी टी दिलीप हे टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत.
मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत गंभीरचे काय मत?
अलीकडेच, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले होते की, वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा प्रशिक्षक असणार नाही. अशा परिस्थितीत तिन्ही फॉरमॅटसाठी एकाच प्रशिक्षकाचा शोध असेल, जो ३.५ वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी सांभाळेल. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत गौतम गंभीरने मोठे वक्तव्य केले आहे. या माजी सलामीवीराने सांगितले की, मला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनायला आवडेल.
हेही वाचा – “भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी…”, अनिल कुंबळेचे गौतम गंभीरच्या प्रशिक्षक होण्याच्या चर्चांवर मोठे वक्तव्य
गौतम गंभीर म्हणाला होता की, “आपल्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. तुम्ही १४० कोटी भारतीयांचे आणि जगभरातील त्याहूनही अधिक भारतीयांचे प्रतिनिधित्व करत आहात आणि जेव्हा तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करता, तेव्हा यापेक्षा मोठे काहीही कसे असू शकते? भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी मदत करणारा मी नाही तर १४० कोटी भारतीय आहेत, जे टीम इंडियाला विश्वचषक जिंकण्यास मदत करतील. जर सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आणि आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करू लागलो तर भारत विश्वचषक जिंकेल.”