Afghanistan won by 84 runs against New Zealand : टी-२० विश्वचषक २०२४ चा १४ वा सामना न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने मोठा अपसेट घडवून आणला आहे. अफगाणिस्तानने आपल्या शानदार फिरकी गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडवर ८४ धावांनी मात करत इतिहास रचला. कारण टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान संघाचा न्यूझीलंडविरुद्धचा हा पहिला विजय आहे. अफगाणिस्तानने संघाने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर १६० धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघ ७५ धावांत गारद झाला. किवी संघाला पूर्ण २० षटकेही खेळता आली नाहीत. या विजयात राशिद खान आणि फजलहक फारुकीने महत्त्वाची भूमिका निभावली.

अफगाणिस्तानचा न्यूझीलंडविरुद्ध टी-२० क्रिकेटमधला पहिला विजय –

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. या सामन्यात फिल ॲलन खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि केन विल्यमसन यांनाही मोठी खेळी करता आली नाही. अफगाण गोलंदाज फजलहक फारुकीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज हतबल दिसत होते आणि त्यांना मुक्तपणे फटके मारता आले नाहीत. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक १८ धावा केल्या. मॅट हेन्रीने १२ धावा केल्या. डॅरिल मिशेल पाच, केन विल्यमसन नऊ, मार्क चॅपमन चार, मायकेल ब्रेसवेल शून्य, ग्लेन फिलिप्स १८, मिचेल सँटनर चार, मॅट हेन्री १२, लॉकी फर्ग्युसन दोन धावा करून बाद झाले.

न्यूझीलंडला टी-२० विश्वचषकातील सर्वात मोठा पराभव –

त्याचवेळी ट्रेंट बोल्ट तीन धावा करून नाबाद राहिला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. फजलहक फारुकी आणि राशिद खानने प्रत्येकी चार तर मोहम्मद नबीने दोन विकेट घेतल्या.न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १५.२ षटकांत ७५ धावांत सर्वबाद झाला. न्यूझीलंडने हा सामना ८४ धावांनी गमावला असून, हा त्यांचा टी-२० विश्वचषकातील सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी २०१४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघ श्रीलंकेविरुद्ध ५९ धावांनी पराभूत झाला होता.

हेही वाचा – AFG vs NZ T20 WC 2024 : अफगाणिस्तानचा न्यूझीलंडला दणका; ८४ धावांनी ऐतिहासिक विजय

रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रानची शतकीय भागीदारी –

तत्पूर्वी नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १५९ धावा केल्या होत्या. या सामन्यात रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची स्फोटक भागीदारी झाली. मॅट हेन्रीने संघाला पहिला धक्का दिला. त्याने झाद्रानला बोल्ड केले. त्याला तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४४ धावा करता आल्या. यानंतर हेन्रीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजमतुल्ला ओमरझाईला आपला बळी बनवले. तो २२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

हेही वाचा – T20 WC 2024 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्याचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘IND vs PAK मॅच म्हणजे युद्ध…’

या सामन्यात सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने स्फोटक फलंदाजी केली. त्याने ५६ चेंडूत ८० धावा केल्या. यादरम्यान त्याने १४२.८५ च्या स्ट्राईक रेटने पाच चौकार आणि तेवढेच षटकार मारले. या सामन्यात राशिद खान सहा धावा करून बाद झाला, तर गुलबदिन नायबला भोपळाही बाद फोडता आला नाही. तसेच करीम आणि नजीबुल्लाह प्रत्येकी एक धावेव नाबाद परतले. किवी संघाकडून बोल्ट आणि हेन्रीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या तर लॉकी फर्ग्युसनला एक विकेट मिळाली.

Story img Loader