Afghanistan beat Uganda by 125 runs : टी-२० विश्वचषक २०२४ च्या पाचव्या सामन्यात अफगाणिस्तानने युगांडाचा १२५ धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानसाठी हा मोठा विजय होता. या सामन्यात रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी अफगाणिस्तानसाठी फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली, फजल हक फारुकीने ५ विकेट्स घेत युगांडाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. अफगाणिस्तानच्या १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडा अवघ्या ५८ धावांत सर्वबाद झाला.
गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात युगांडाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी अजिबात चांगला ठरला नाही. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या अफगाणिस्तानने २० षटकांत ५ बाद १८३ धावा केल्या होत्या. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी १५४ (८८ चेंडू) धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर युगांडाच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
१४ षटकांपर्यंत भरघोस धावा देणाऱ्या युगांडाच्या गोलंदाजांनी शेवटच्या ६ षटकांत शानदार पुनरागमन करत अफगाणिस्तानला बॅकफूटवर ढकलले. या ६ षटकांत अफगाणिस्तानच्या फलंदाजांना एकही चौकार मारता आला नाही. मात्र युगांडाचे फलंदाज संघाला फारशी साथ देऊ शकले नाहीत. १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाचा संघ १६ षटकांत ५८ धावांवर सर्वबाद झाला. रॉबिन्सन ओबुयाने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने एका षटकाराच्या मदतीने १४ धावा केल्या.
हेही वाचा – T20 World Cup 2024 : राहुल द्रविड म्हणतो, आमुचा रामराम घ्यावा
युगांडाच्या ११ फलंदाजांपैकी फक्त २ फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. पहिल्याच षटकापासून संघाने विकेट्स गमावण्यास सुरुवात केली. पहिल्याच षटकात फजलहक फारुकीने रौनक पटेल (४) आणि रॉजर मुकासा (०) यांना सलग दोन चेंडूंवर पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यामुळे संघाला पहिले दोन धक्के बसले. त्यानंतर दुसऱ्या षटकात सायमन सेसाझीच्या (४) रूपाने संघाने तिसरी विकेट गमावली. यानंतर संघाने पाचव्या षटकात दिनेश नाक्राणीच्या (६) रूपाने चौथी विकेट गमावली. त्यानंतर त्याच षटकात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या अल्पेश रामजानीच्या रूपाने संघाला पाचवा धक्का बसला.
हेही वाचा – T20 World Cup: ‘आयपीएल संघमालकांना सिक्स मारणारे खेळाडूच आवडतात’, आरसीबीचा कर्णधार कोणाला असं म्हणाला?
फजल हक फारुकीने घेतल्या सर्वाधिक ५ विकेट्स –
अफगाणिस्तानकडून फजल हक फारुकीने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने ४ षटकात केवळ ९ धावा दिल्या. नवीन उल हक आणि कर्णधार राशिद खान यांना प्रत्येकी २ विकेट्स मिळाल्या. नवीनने २ षटकांत ४ धावा आणि रशीदने ४ षटकांत १२ धावा दिल्या. उर्वरित एक विकेट मुजीब उर रहमानच्या खात्यात आली. मुजीबने ३ षटकात १६ धावा दिल्या.