अफगाणिस्तान टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर८ फेरीत पोहोचला आहे. क गटातून वेस्ट इंडिजसह अफगाणिस्तान सुपर८मध्ये धडक मारली आहे. सलग तिसरा सामना जिंकत अफगाणिस्तान सर्वाधिक नेट रन रेटसह सुपर८ साठी पात्र ठरला आहे, तर त्यांच्या विजयाने केन विल्यमसनच्या नेतृत्त्वाखालील चॅम्पियन न्यूझीलंड संघाचे टी-२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. तर न्यूझीलंडसोबतच बांगलादेशच्या विजयासह श्रीलंकेनेही आपला गाशा गुंडाळला आहे.
अफगाणिस्तानने या सामन्यात प्रथम पापुआ न्यू गिनीला ९५ धावांवर सर्वबाद आणि नंतर अवघ्या १५.१ षटकांत ३ गडी गमावून १०१ धावा करत विजय मिळवला. अफगाणिस्तानचा फझलहक फारूकी तुफान फॉर्मात असून ३ विकेट्स घेत या सामन्याचा सामनावीरही ठरला. आता त्यांना १८ जून रोजी यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे.
अफगाणिस्तानच्या विजयासह क गटात मोठा बदल पाहायला मिळाला. अफगाणिस्तानच्या विजयाचा थेट परिणाम तीन संघांवर झाला आहे. आता क गटातील तीन संघ सुपर८ च्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. ज्यामध्ये सर्वात मोठे नाव न्यूझीलंडचे आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत २ सामने खेळले असून किवी संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. न्यूझीलंडसह पापुआ न्यू गिनी आणि युगांडा हे संघही विश्वचषकातून बाहेर पडले आहेत.
न्यूझीलंडचा ट्वेन्टी२० वर्ल्डकपमधला प्रवास
२००७- सेमी फायनल
२००९- दुसरी फेरी
२०१०- दुसरी फेरी
२०१२- दुसरी फेरी
२०१४- दुसरी फेरी
२०१६- सेमी फायनल
२०२१- उपविजेते
२०२२- सेमी फायनल
२०२४- प्राथमिक फेरी
बांगलादेशने नेदरलँड्सवर २५ धावांनी विजय मिळवल्याने श्रीलंका टी-२० विश्वचषक २०२४ मधून बाहेर पडला. ड गटातील तीन सामन्यांमध्ये तीन विजयांसह दक्षिण आफ्रिका सुपर८ साठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. बांगलादेश तीन सामन्यांत दोन विजय आणि ०.४७८ च्या नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे तर नेदरलँड्सचा नेट रन रेट एका विजयासह -०.४०८ आहे. नेपाळचा एक सामना पावसाने रद्द झाला तर संघाने एक सामना गमावला, त्यानंतर संघ चौथ्या स्थानावर आहे तर श्रीलंकेने तीनपैकी पहिले दोन सामने गमावले. त्यांना नेपाळविरुद्ध कोणत्याही किंमतीत विजय मिळवायचा होता, मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला. आता श्रीलंकेचा शेवटचा सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे, जो जिंकला तरी त्यांना केवळ तीन गुणच गाठता येतील, जे सुपर८ मध्ये जाण्यासाठी पुरेसे नाही.
श्रीलंकेचा ट्वेन्टी२० वर्ल्डकपमधला प्रवास
२००७- दुसरी फेरी
२००९- उपविजेते
२०१०- सेमी फायनल
२०१२- उपविजेते
२०१४- विजेते
२०१६- दुसरी फेरी
२०२१- दुसरी फेरी
२०२२- दुसरी फेरी
२०२४- प्राथमिक फेरी
अफगाणिस्तान आणि पापुआ न्यु गिनीच्या सामन्याबद्दल बोलायचं तर, प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनीची सुरुवात खराब झाली. १२ धावांवर संघाने ३ विकेट गमावले, त्यामुळे अफगाणिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर संघाला ९५ धावांपर्यंत मजल मारता आली. अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकीने १६ धावांत ३ विकेट घेतले, तर नवीन उल हकने २ आणि नूर अहमदने एक विकेट मिळवली. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाच्या सलामीवीरांनी झटपट विकेट गमावल्या, पण गुलबदीन नायबने संघाचा डाव उचलून धरला. गुलबदीन नायबने ३६ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ४९ धावा केल्या, तर मोहम्मद नबीने २३ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने १६ धावांची नाबाद खेळी करत संघाला सुपर८चे तिकीट मिळवून दिले.