Rohit Sharma says we should dance if we win the world cup : टी-२० विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकून भारतीय क्रिकेट संघ अखेर गुरुवारी मायदेशी परतला. बार्बाडोसच्या मैदानावर अंतिम सामना जिंकल्यानंतर, तेथे आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया लगेच निघू शकली नाही. टीम इंडियाचे सर्व खेळाडू बार्बाडोसहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने थेट दिल्लीला पोहोचल्यानंतर हॉटेलकडे रवाना झाले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी टीम सकाळी ११ वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचली. यानंतर टीम इंडिया मुंबईत पोहोचली. जिथे विजयी परेड पार पडल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मराठीत संवाद साधला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी विजयी परेडसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. कारण लाखो क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूची झलक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. वेळापत्रकानुसार, विजय मिरवणूक (टीम इंडिया व्हिक्टरी परेड) नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनपीसीए) येथून संध्याकाळी ५ वाजता सुरू होणार होती आणि ७ वाजता वानखेडे स्टेडियमवर संपणार होती, परंतु ती संध्याकाळी ७.३० नंतरच सुरू होऊ शकली.

टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीनंतर रोहित शर्माने माध्यमांशी बोलताना मराठीत संवाद साधला. ११ वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी भारतात आली त्याचा खूप आनंद आहे. त्याचबरोबर योग्य वेळीच टी-२० आंतरराष्ट्रीय निर्णय घेतला. भारताने २००७ साली पहिला तर २०२४ मध्ये दुसरा टी-२० विश्वचषक जिंकला. हे दोन्ही माझ्यासाठी खास आहेत, अशी रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली. यानंतर रोहित शर्मा म्हणाला, “११ वर्षानंतर ट्रॉफी आपल्या इंडियात आल्याने आता सगळ्यांना खूप आनंद आहे. त्याचबरोबर निवृत्तीसाठी हीच वेळ योग्य होती. तसेच आपण वर्ल्ड कप जिंकलोय त्यामुळे आता नाचायला पाहिजे.” हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

हेही वाचा – विराट-रोहितचे पाय थिरकले अन् संपूर्ण टीम इंडियाने डान्स करत केलं भन्नाट सेलिब्रेशन; वानखेडेवरील व्हायरल VIDEO

वानखेडे स्टेडियमवर विराट-रोहितसह टीम इंडियाने केला डान्स –

विजय परेड संपवून वानखेडे स्टेडियमवर आल्यानंतर विराट कोहली-रोहित शर्मासह सर्व भारतीय संघाने एकत्र डान्स केला , ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट-रोहित चालता चालता दोघेही नाचू लागले. यानंतर संपूर्ण टीमने आनंदाने उड्या मारल्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत पोहोचल्यापासून विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचल्यावर रोहित शर्मानेही थोडा डान्स केला. तो हॉटेलबाहेर नाचताना दिसला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 11 years we won the world cup and we should dance after the victory parade rohit sharma speaking marathi vbm