Team India along with Virat Rohit danced to the beat of dhol tasha : भारतीय क्रिकेट संघाने ४ जुलै रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांसोबत आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ चा विजय शानदार शैलीत साजरा केला. बीसीसीआयने आपल्या टी-२० विश्वचषक विजेत्याचे स्वागत करण्यासाठी विजय परेड आणि सत्कार समारंभ आयोजित केला होता, ज्यात मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमला ​​खुल्या बसमधून जात असताना खेळाडू चाहत्यांना भेटले. वानखेडे स्टेडियमवर आल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरत चाहत्यांचे मनोरंजन केले.

वानखेडे स्टेडियमवर विराट-रोहितसह टीम इंडियाने केला डान्स –

विजय परेड संपवून वानखेडे स्टेडियमवर आल्यानंतर विराट कोहली-रोहित शर्मासह सर्व भारतीय संघाने एकत्र डान्स केला , ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट-रोहित चालता चालता दोघेही नाचू लागले. यानंतर संपूर्ण टीमने आनंदाने उड्या मारल्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत पोहोचल्यापासून विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचल्यावर रोहित शर्मानेही थोडा डान्स केला. तो हॉटेलबाहेर नाचताना दिसला.

भारतीय क्रिकेट संघ संध्याकाळी मुंबईत पोहोचताच टीम इंडियाचे विमानतळावर जंगी स्वागत झाले. यानंतर टीम इंडिया लाखो चाहत्यांसह विजय परेडमध्ये सामील झाली. मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमवर विजय परेड संपन्न झाली. त्यानंतर वानखेडे स्टेडियमध्ये टीम इंडियाचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी बीसीसीआयने भारतीय संघाला १२५ कोटी रुपयांचा चेक बक्षीस म्हणून देऊन गौरविले. चाहत्यांनी भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा उत्सव पाहिला. विराट कोहलीने आपला आनंद चाहत्यांशी शेअर केला आणि अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारताच्या विजयाचे श्रेय जसप्रीत बुमराहला दिले.

हेही वाचा – Victory Parade : “मी १५ वर्ष रोहितबरोबर खेळतोय, त्याला इतकं भावुक कधीच पाहिलं नाही…’, विराटकडून हिटमॅनचं कौतुक

‘आता मी वरिष्ठ खेळाडूंच्या त्या भावना समजू शकतो’ –

आपल्या टी-२० टी-२० आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर बोलताना विराट कोहली म्हणाला, ‘सामना संपल्यानंतर मला कळले की आता वेळ आली आहे की पुढच्या पिढीने जबाबदारी स्वीकारली पाहिजे.’ २०११ मध्ये तो संघाचा सर्वात तरुण सदस्य होता. त्याने सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांना भावुक होताना पाहिले होते आणि कदाचित त्यांना त्यांची भावनिकता समजली नसेल. पण आता तो नीट समजू शकतो. तो म्हणाला, ‘त्या रात्री (२०११ विश्वचषक जिंकल्यानंतर) वरिष्ठ खेळाडूंच्या भावना मी समजू शकलो नाही, जेव्हा ते रडायला लागले होते, पण आता मी त्या समजू शकतो.’