Rahul Dravid Makes Bold Prediction About Virat Kohli: धावांचा दुष्काळ एकदा का सुरु झाला की पुन्हा चौकार- षटकारांची बरसात व्हायला खूप वाट पाहावी लागते. अशीच धावांची प्रतीक्षा सध्या भारताचा स्टार खेळाडू व माजी कर्णधार विराट कोहली करतोय. यंदाच्या टी २० विश्वचषक स्पर्धेत कोहलीच्या फलंदाजीची जादू काही केल्या काम करतच नाहीये. विराट कोहलीचं यंदाच्या विश्वचषकातील योगदान पाहता, संघासाठी त्याने सात सामन्यांमध्ये केवळ ७५ धावा केल्या आहेत. टी २० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत म्हणजेच भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यात कोहलीला अवघ्या ९ धावा करता आल्या होत्या. या मुद्द्यावरून ऑनलाईन चर्चा, ट्रोलिंग होत असलं तरी संघाला मात्र कोहलीच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे.
उपांत्य फेरीत टीम इंडिया विजयी झाल्यावर बोलताना स्वतः कर्णधार रोहित शर्माने, “विराट कोहली हा मोठा खेळाडू आहे, त्याच्याकडे १५ वर्षांचा अनुभव आहे तो कदाचित अंतिम सामन्यात कमाल करू शकतो”, असं म्हटलं होतं. विराट कोहलीचे चाहते कदाचित या गोष्टीला पूर्ण समर्थन दर्शवतील की, कोहलीने संपूर्ण कारकिर्दीत अधिक दबाव असणाऱ्या सामन्यांमध्येच उत्तम कामगिरी केली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामना याला काही प्रमाणात अपवाद म्हणता येईल. पण तरी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कोहलीची बॅट पुन्हा तळपण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सुद्धा विराट कोहलीच्या फॉर्मबाबत महत्त्वाकांक्षी शक्यता वर्तवली आहे. द्रविड भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, “जोखीम जास्त असणारा खेळ हा कधी कधी आपल्यावरच उलटू शकतो. विराटच्या बाबत हे अनेकदा होतं. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यातही त्याने एका षटकारासह सुरुवात चांगली केली होती पण तेव्हा चेंडू जास्तच वळला. काहीही असलं तरी मला त्याचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आवडतो, त्याचा हेतू चांगला असतो. संघासाठी एखादी व्यक्ती जोखीम उचलू पाहतेय यामुळे इतरांसमोर चांगलं उदाहरण सेट होतं”.
हे ही वाचा<< “बुमराह तू ये, माझा हात..”, IND vs ENG मॅच जिंकताच अंपायरच्या भेटीला गेला जसप्रीत पण.. Video पाहून चाहते लोटपोट
पुढे मस्करीत द्रविड असंही म्हणाला की, “मला आता नजर लावायची नाहीये (जिंक्स करायचं नाही) पण मला वाटतं आगामी सामन्यांमध्ये त्याची वचनबद्धता आणि मुळात खेळण्याचा ऍटिट्यूड काही मोठे बदल घडवू शकतो. आणि कोहली त्यासाठी नक्कीच पात्र आहे.”
आता, शनिवारी २९ जूनला बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा टी २० विश्वचषकातील अंतिम सामना पार पडणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा सामना करताना सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील.