Who will be the captain of Indian T20 team after Rohit Sharma : भारतीय संघाने अनेक वर्षांचा दुष्काळ संपवला आणि आयसीसी ट्रॉफी आणि विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीत भारताने ७ धावांनी विजय मिळवला आणि टी-२० विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकली. टूर्नामेंट जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. आता कर्णधारपदाच्या संदर्भात मोठा प्रश्न आहे की, या फॉरमॅटमध्ये संघाची धुरा कोण सांभाळणार? हार्दिक पंड्या या शर्यतीत नक्कीच आघाडीवर आहे, कारण तो सध्या संघाचा उपकर्णधारही आहे. मात्र आणखी दोन खेळाडूही कर्णधारपदासाठी दावेदार मानले जात आहेत.
कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक पंड्या आघाडीवर –
हार्दिक पंड्याकडे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० सामने खेळण्याचा अनुभव आहे, जो इतर कोणत्याही स्पर्धकाकडे नाही. पंड्याने १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी १० सामने संघाने जिंकले आहेत. हार्दिक पंड्याने त्याच्या नेतृत्व क्षमतेच्या जोरावर गुजरात टायटन्सला पहिल्याच सत्रात आयपीएल २०२२ चे चॅम्पियन बनवले. २०२३ मध्येही त्याने संघाला अंतिम फेरीत नेले होते, मात्र संघ उपविजेता राहिला. हार्दिक पंड्याने ५ द्विपक्षीय मालिकांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले, ज्यापैकी संघाने ४ जिंकल्या. मात्र, मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याची कामगिरी चांगली राहिली नाही आणि संघ गुणतालिकेत तळाशी राहिला. पंड्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४९२ धावा केल्या आहेत, पण कर्णधार म्हणून त्याला केवळ २९६ धावा करता आल्या.
दुसरा दावेदार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह –
जसप्रीत बुमराहने ७० सामन्यात ८९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे आणि दोन्ही सामने जिंकले आहेत. बुमराहने त्याच्या नेतृत्वाखाली ४ विकेट्स घेतल्या आहेत. रोहित, कोहली आणि जडेजा यांच्या निवृत्तीनंतर, बुमराह हा सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे आणि त्याचा सक्सेस रेट १००% आहे. या सर्व कारणांमुळे जसप्रीत बुमराहचा पुढचा कर्णधार म्हणून दावा मजबूत दिसत आहे. बुमराहला अनेक महत्त्वाच्या प्रसंगी दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीत बुमराहच्या फिटनेसबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि तो त्याच्या कर्णधारपदाच्या मार्गात अडथळा ठरू शकतो. यासोबतच, आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला भारतीय टी-२० संघाचा नियमित कर्णधार बनवण्यात आलेला नाही. या कारणांमुळे बुमराहचा कर्णधारपदाचा दावा कमकुवत होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने अद्याप भारताच्या ट-२० संघाच्या कर्णधाराची घोषणा केलेली नाही.
हेही वाचा – Team India : विराट-रोहितनंतर ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूनेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला रामराम
सूर्यकुमार यादव –
सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ६८ सामन्यात २३४० धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने शतकही ठोकले आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाची देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. सूर्याने तीन देशांतर्गत मालिकांमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व केले असून या सर्व मालिका मुंबई संघाने जिंकल्या आहेत.
हार्दिक आणि पंत यांच्याइतका कर्णधारपदाचा अनुभव सूर्यकुमारकडे नाही. त्याने केवळ ७ टी-२० आंतरराष्ट्रीय आणि एका आयपीएल सामन्याचे नेतृत्व केले आहे. सूर्यकुमार ३३ वर्षांचा आहे. मात्र, क्रिकेट नियामक मंडळाने नेहमीच तरुण खेळाडूला कर्णधार बनविण्यास प्राधान्य दिले आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादवचा अनुभव आणि वय या दोन्ही गोष्टी त्याच्या कर्णधारपदाच्या मार्गात अडथळा ठरू शकतात.