Virat Kohli Meets Childhood Coach Rajkumar Sharma : टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी भारतात पोहोचला, तेव्हा संपूर्ण देश त्यांच्या स्वागतासाठी जल्लोषात गेला. भारताचा ऐतिहासिक विजय संस्मरणीय बनवण्यासाठी बीसीसीआयने खास योजना आखली होती. वानखेडे स्टेडियमपर्यंत टीम इंडियासाठी विजय परेड आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर शानदार सत्कार सोहळ्याचाही सर्वांनी आनंद लुटला. आता त्यांच्याशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील काही फोटो दिग्गज फलंदाज विराट कोहली त्याच्या गुरूला भेटतानाचे आहेत.
वास्तविक, वानखेडे स्टेडियमवर सेलिब्रेशन केल्यानंतर सर्व खेळाडू त्यांच्या कुटुंबीयांना भेटताना दिसले. मात्र, या धडाकेबाज फलंदाजाचे कुटुंब काही कारणास्तव मुंबईत पोहोचू शकले नाही. अशा परिस्थितीत त्याचे बालपणीचे गुरु राजकुमार शर्मा कोहलीचे स्वागत करण्यासाठी पोहोचले. आपल्या बालपणीच्या प्रशिक्षकाला पाहून हा अनुभवी फलंदाज भावूक झाला आणि त्यांना मिठी मारली. या खास क्षणाचे फोटो विराटच्या प्रशिक्षकांनी शेअर केले आहेत.
विराट कोहलीने बालपणीच्या कोचची घेतली गळाभेट –
विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर विराट कोहलीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विराटने सेलिब्रेशनदरम्यान जे कपडे घातले होते, तेच कपडे घातलेले दिसत आहेत. यावरून स्पष्टपणे दिसून येते की गुरुवारीच त्याने आपल्या बालपणीच्या प्रशिक्षकांची भेट घेतली. राजकुमार शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर विराटबरोबरचे फोटो शेअर करत लिहिले, ‘आपल्या पहिल्या सराव सत्रापासून ते अविश्वसनीय यशापर्यंत. तू माझा नेहमीच अभिमान वाढवला आहेस. असाच भक्कमपणे पुढे जात रहा.’
हेही वाचा – VIDEO : ‘व्हिक्टरी परेड’नंतर विराट कोहली अचानक लंडनला रवाना, काय आहे कारण? जाणून घ्या
राजकुमार शर्मा २०१६ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित –
त्याच्या बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राजकुमार यांनीच कोहलीला क्रिकेटचे सुरुवातीचे प्रशिक्षण दिले. कोहली त्याच्या प्रशिक्षकांचा खूप आदर करतो. कोहलीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील चमकदार कामगिरीबद्दल राजकुमार शर्मा यांना २०१६ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा – टीम इंडियात १२५ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेचे वितरण कसे होणार? टॅक्समध्ये किती पैसे कापले जातील? जाणून घ्या
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली नुकत्याच पार पडलेल्या टी-३० विश्वचषकात आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी धडपडत होता, मात्र त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावले आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कोहलीने ५९ चेंडूत ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताची धावसंख्या १७० धावांच्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. टूर्नामेंट संपल्यानंतर किंग कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, तो कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळत राहणार आहे.