टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत सुपर-१२ मधील भारताचा तिसरा सामना रविवारी (३० ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघ पर्थमध्ये आमनेसामने येणार आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघही रविवारी याच मैदानावर नेदरलॅंडविरुद्ध आपला सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ पर्थमध्ये आहेत. यादरम्यान माजी कर्णधार विराट कोहलीची पाकिस्तानी गोलंदाजांनी भेट घेतली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सुपर-१२ मधील भारताच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध संस्मरणीय खेळी खेळली होती. त्याने विरोधी संघाच्या सर्व गोलंदाजांची शानदार धुलाई केली होती. त्यानंतर पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ पर्थला पोहोचल्यानंतर विराट कोहलीला भेटले. यादरम्यान तिघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. खेळाडूंमध्येही हास्याचे आणि विनोदाचे वातावरण होते.

कोहलीने मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावांची खेळी केली होती. हरिस रौफच्या १९व्या षटकात त्याने मारलेले दोन षटकार सर्व क्रिकेट चाहत्यांना आठवत आहेत. षटकाच्या पाचव्या चेंडूवर कोहलीने समोर षटकार ठोकला. त्याचवेळी सहाव्या चेंडूवर त्याने फाइन लेगवर फ्लिक करत षटकार मारला. या दोन षटकारांनी सामना पलटला. टीम इंडियाला शेवटच्या षटकात १६ धावा करायच्या होत्या. भारताने मोहम्मद नवाजच्या षटकात त्या केल्या आणि आपला सलग दुसरा विजय नोंदवला.

भारताविरुद्धचा सामना हरल्यानंतर पाकिस्तानचा संघ झिम्बाब्वेकडूनही पराभूत झाला. दुसऱ्या सामन्यात त्याचा एका धावेने पराभव झाला. सलग दोन पराभवानंतर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाद होण्याच्या मार्गावर आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील. नेदरलँड्सनंतर त्यांचा सामना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशशी होणार आहे. तिन्ही सामने जिंकण्याबरोबरच पाकिस्तानला इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : पाकिस्तानविरुद्धच्या कोहलीच्या खेळीची तुलना ग्रेग चॅपेलनी केली भगवत गीतेशी, म्हणाले विराट…!

Story img Loader