टी-२० विश्वचषक २०२२ भारतीय सलामीवीर केएल राहुलसाठी अजिबात चांगला जात नाही. टीम इंडियाने आत्तापर्यंत दोन सामने खेळले आहेत, दोन्ही सामन्यांमध्ये केएल राहुल फ्लॉप झाला आहे. त्यामुळे त्याला तिसऱ्या सामन्यात संधी मिळणार की नाही याबाबत शंका आहे. तत्पुर्वी त्याच्या या फॉर्मबद्दल माजी खेळाडू अनिल कुंबळेने प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त ४ धावा आल्या. त्याचवेळी, नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात तो १२ चेंडूत केवळ ९ धावा करू शकला.

ईएसपीएनक्रिकइंफोशी बोलताना अनिल कुंबळे म्हणाले, “आयपीएलमध्ये ही वेगळी गोष्ट होती. आम्ही सर्व म्हणत होतो की तू सर्वोत्तम खेळाडू आहेस. जा आणि साध्या पद्धतीने फलंदाजी कर. पहिल्याच चेंडूवर वर्चस्व मिळवा, तुमच्याकडे जे चांगले आहे ते करा. विशेषत: पॉवरप्लेमध्ये, मला वाटत नाही की कोणताही गोलंदाज त्याला शांत ठेवू शकेल.”

कुंबळे म्हणाले, ”जेव्हा आम्ही फ्रँचायझी क्रिकेट खेळायचो तेव्हा त्याला वाटायचे की, बाकीच्या बॅटिंग लाइनअपचा विचार करता त्याला बराच वेळ फलंदाजी करावी लागेल. तसेच तो कर्णधारही आहे. तुम्ही बाहेरून तुम्हाला जे हवं ते बोलू शकता. पण मैदानावर काय घडतं यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही.”

हेही वाचा – IND vs SA T20 World Cup 2022 : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी मार्करामने कोहलीला दिला इशारा, म्हणाला आमचे गोलंदाज…!

अनिल कुंबळे हे भारतीय संघ आणि पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. ते म्हणाले, ”भारतीय संघाची स्थिती थोडी वेगळी आहे. मला वाटते की त्याची भूमिका फक्त जा आणि फलंदाजी कर इतकीच आहे. जेव्हा मी प्रशिक्षक होतो तेव्हा मला ते बदलायचे नव्हते, त्याने फक्त केएल व्हावे आणि पहिल्याच चेंडूवर परिस्थिती सेट करावी अशी माझी इच्छा होती. मला वाटते की, तो कोणत्याही कारणास्तव स्विच ऑन आणि स्विच ऑफ करत आहे.

माजी प्रशिक्षक पुढे म्हणाले, ”आम्ही त्याला पंजाब विरुद्ध चेन्नईच्या शेवटच्या सामन्यात पाहिले होते जिथे, त्याने त्या धावा केल्या आणि त्याचा रनरेट चांगला केला होता. तो काय करू शकतो हे आपण पाहिले आहे. आणि चेन्नईकडे काही चांगले आंतरराष्ट्रीय गोलंदाज असताना, त्यांनी सर्व गोलंदाजांची धुलाई केली.”

त्याने सामन्याबद्दल पुढे सांगितले की, “आयपीएल २०२१ मध्ये चेन्नईने पंजाबविरुद्ध ६ गडी गमावून १३४ धावा केल्या होत्या. धावगती सुधारण्यासाठी राहुलने वेगवान फलंदाजी करताना ४२ चेंडूत ९८ धावा केल्या. त्याच्या खेळीत ७ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता.