Arshdeep Singh takes two wickets in one over : टी-२० विश्वचषक २०२४ च्या आठव्या सामन्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि आयर्लंड आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये रोहित शर्माने नाणेफेके जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. त्याने डावातील तिसऱ्या षटकात दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत आयरिश संघाला मोठा धक्का दिला. या दोन्हीपैकी एका फलंदाजाला अर्शदीप सिंगने क्लीन बोल्ड केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात सातच्या धावसंख्येवर आयर्लंड संघाला पहिला धक्का तिसऱ्या षटकात बसला. अर्शदीप सिंगने कर्णधार पॉल स्टर्लिंगला यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद केले. त्याला सहा चेंडूंत दोन धावा करता आल्या. नासाऊ काउंटी मैदानावरील खेळपट्टीने आतापर्यंत अमर्यादित उसळी पाहिली आहे. काही चेंडू खूप उसळत आहेत तर काही खाली राहिले आहेत. तो भारताकडून टी-२० विश्वचषक २०२४ च्या हंगामात पहिली विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. तो एकच विकेट शांत बसला नाही.
अर्शदीप सिंगने एकाच षटकात घेतल्या दोन विकेट्स –
अर्शदीप सिंगने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अँड्र्यू बालबर्नीला क्लीन बोल्ड केले. त्याला पाच धावा करता आल्या. तीन षटकांनंतर आयर्लंडची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात नऊ धावा होती. आता अँड्र्यू बालबर्नीला क्लीन बोल्ड केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर सातव्या षटकात २८धावांवर आयर्लंडला तिसरा धक्का बसला. हार्दिक पंड्याने आपल्या पहिल्याच षटकात लॉर्कन टकरला क्लीन बोल्ड केले. त्याला १३चेंडूत १०धावा करता आल्या.
हेही वाचा – IND vs PAK सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “न्यूयॉर्कमध्ये जिंकायचं असेल तर…”
आठव्या षटकात ३६ धावांवर आयर्लंडला चौथा धक्का बसला. जसप्रीत बुमराहने हॅरी टेक्टरला विराट कोहलीने झेलबाद केले. त्याला चार धावा करता आल्या. यानंतर नवव्या षटकात हार्दिक पंड्याने शेवटच्या चेंडूवर कर्टिस कॅम्फरला यष्टिरक्षक पंतकडे झेलबाद केले. कॅम्फरला १२ धावा करता आल्या. नऊ षटकांनंतर आयर्लंडची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात ४४ धावा होती. तसेच १०षटकांनंतर आयर्लंडने सहा गडी गमावून ४९धावा केल्या आहेत. १०व्या षटकात सिराजने जॉर्ज डॉकरेलला बुमराहकरवी झेलबाद केले. त्याला तीन धावा करता आल्या.
आयर्लंडचा संघ ९६ धावांत सर्वबाद झाला –
अर्शदीप सिंगने १६व्या षटकात १७ धावा दिल्या आणि शेवटची विकेट धावबादच्या रूपात घेतली. अशाप्रकारे आयरिश संघ ९६ धावांत सर्वबाद झाला. आयर्लंडच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. सातव्या क्रमांकावर आलेल्या गॅरेथ डेलेनीने सर्वाधिक २६ धावा केल्या. भारताकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.