आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारत-पाकिस्तान सामन्याला फक्त दोन दिवस उरले आहेत. २३ ऑक्टोबरला (रविवारी) मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्याबाबत अनेक माजी क्रिकेटपटूंनीही अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. या कडीमध्ये भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाही सामील झाला आहे. त्याने भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमबद्दल वक्तव्य केले आहे.
रैनाने बाबरचेही कौतुक केले आणि कोणत्या भारतीय गोलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात यश येईल हेही सांगितले. गेल्या वर्षी यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताचा १० विकेट्सनी पराभव केला होता. टीम इंडियालाही यावेळी त्याचा बदला घ्यायला आवडेल. २२ ऑक्टोबरपासून सुपर-१२ची फेरी सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील.
एका न्यूज वेबसाईटशी बोलताना सुरेश रैनाने बाबरचे खूप कौतुक केले. तो म्हणाला, बाबर एक चांगला कर्णधार आणि खरोखर चांगला क्रिकेटर आहे. त्याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. पण आशा आहे की, तो जेव्हा खेळायला येईल, तेव्हा त्याला अर्शदीप सिंग बाद करेल.
गेल्या महिन्यात आशिया चषक स्पर्धेत दोन सामन्यांत आमनेसामने आल्यानंतर, या वर्षात दोन्ही संघ टी-२० सामन्यात आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ असेल. बाबरने अर्शदीपविरुद्ध दोन डावात सहा धावा केल्या आहेत. ज्यात एक चौकार आणि तीन डॉट बॉलचा समावेश होता. मात्र बाबर डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध काहीवेळा कमजोर दिसला आहे. गेल्या दोन वर्षांत तो डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये १२ वेळा बाद झाला आहे.