ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड संघात टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३१ वा सामना आज पार पडला. ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४२ धावांनी विजय नोंदवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघासमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु आयर्लंडचा संघ १३७ धावांवर आटोपला. आयर्लंडकडून लॉर्कन टकरने एकाकी झुंज देताना अर्धशतक झळकावले.

१८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. २५ धावांवर संघाच्या पाच विकेट पडल्या. त्यानंतर टकरने डेलेनी आणि अडायरसोबत उपयुक्त भागीदारी करून आयर्लंडची धावसंख्या १०० पर्यंत नेली. लॉकरन टकरने ४८ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७१ धावा केल्या. परंतु त्याची ही झुंजार खेळी आयर्लंडला विजय मिळवून देऊ शकली नाही.

एका क्षणी असे दिसत होते की, टकर आयर्लंडला स्वतःच्या बळावर विजय मिळवून देऊ शकेल, परंतु ऑस्ट्रेलियाने वेळेवर पुनरागमन करून वळणाची कोणतीही शक्यता नाहीशी केली. आयर्लंडचा संघ १८.१ षटकांत १३७ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्स, स्टार्क, मॅक्सवेल आणि झाम्पा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी हेजलवूडला एक विकेट मिळाली.

हेहा वाचा – T20 World Cup 2022 : हारिस रौफने जिंकले मन, सामन्यानंतर जखमी बेस डी लीडला मारली मिठी, पाहा व्हिडिओ

तत्पुर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आयर्लंडसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. निर्धारित २० षटकांत कांगारू संघाने ५ गड्यांच्या मोबदल्यात १७९ धावा केल्या. ज्यामध्ये कर्णधार फिंचने सर्वाधिक ६३ धावा केल्या. मार्कस स्टॉइनिसने ३५ आणि मिचेल मार्शने २८ धावांचे योगदान दिले. आयर्लंडकडून मॅकार्थीने तीन आणि जोशुआ लिटलने दोन बळी घेतले.