टी२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाचा सोमवारी सुपर८ लढतीत भारताविरुद्ध पराभव झाला. या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाच्या सेमी फायनलच्या आशा जिवंत आहेत. मंगळवारी होणाऱ्या अफगाणिस्तान-बांग्लादेश लढतीच्या निर्णयावर कांगारूंच्या आशा केंद्रित झाल्या आहेत.
सुपर८च्या शेवटच्या लढतीत अफगाणिस्तानने बांगलादेशला हरवलं तर ऑस्ट्रेलियाचं वर्ल्डकप स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल. अफगाणिस्तान हरल्यास त्यांचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल.
या लढतीत बांगलादेशने १६० धावा केल्या आणि त्यांनी ६२ धावांनी विजय मिळवला तर ते सेमी फायनलला जातील. यामुळे साहजिकच ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात येईल. पण बांगलादेशने छोट्या फरकाने विजय मिळवला तर सरस रनरेटच्या बळावर ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये पोहोचेल.
सुपर८च्या पहिल्या गटातून भारतीय संघाने तीनपैकी तीन सामने जिंकत सेमी फायनल फेरीत आगेकूच केली आहे. ऑस्ट्रेलियाने तीनपैकी केवळ एकच लढत जिंकली आहे. त्यांना भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांचा रनरेट -०.३३१ असा आहे.
अफगाणिस्तानने दोन लढती खेळल्या असून एकात त्यांनी ऑस्ट्रेलियाला चीतपट केलं आहे तर भारताविरुद्ध ते पराभूत झाले आहेत. त्यांचा रनरेट -०.६५० असा आहे.
बांगलादेशने २ सामने खेळले असून दोन्ही लढतीत त्यांचा पराभव झाला आहे. त्यांचा रनरेट -२.४८९ असा आहे. बांगलादेशची सुपर८ मधली स्थिती पाहता सेमी फायनल गाठणं त्यांच्यासाठी कठीण आहे. पण पाऊस आणि गणितीय समीकरणं याद्वारे नशीब उघडू शकतं.
अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातच सेमी फायनलच्या जागेसाठी खरी चुरस आहे. भारत आणि इंग्लंड सेमी फायनलमध्ये आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोण उभं ठाकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.