भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य म्हणजे नेहमी प्रसिद्धीझोतात असणं साहजिक. पण दशकभर खेळूनही टीम इंडियाचा एक सदस्य दुसऱ्या फळीतला म्हणूनच गणला जातो. तो खेळाडू म्हणजे अष्टपैलू अक्षर पटेल. रवींद्र जडेजा टीम इंडियाचा प्रमुख फिरकीपटू. डावखुरा फिरकी गोलंदा, उपयुक्त फलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षक ही जडेजाची ओळख. अक्षरही हेच सगळं करतो. यामुळेच जडेजा नसेल तेव्हाच अक्षरचा विचार होतो. एकच गुणवैशिष्ट्य किंवा कौशल्यं असणारी दोन माणसं एकाच संघात खेळवणं अवघड होतं. दशकभर संघाच्या आतबाहेर असूनही अक्षरची खेळाप्रतीची निष्ठा जराही कमी झाली नाही. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये मात्र अक्षर पटेल हे नाव ठसठशीतपणे चाहत्यांच्या मनात उमटलं. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर अक्षरने खणखणीत कामगिरी केली आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
जगभर चर्चा होण्याइतकी मोठी कामगिरी अक्षरने अद्याप केलेली नसली तरी तो टीम इंडियामधील एक उपयुक्त खेळाडू आहे हे नाकारता येत नाही. कारण अक्षर पटेल हा त्याला मिळालेली जबाबदारी चोख पार पाडतो. भारतात अनिल कुंबळे, हरभजन सिंग, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या फिरकीपटूंना त्यांच्या-त्यांच्या काळात प्रसिद्धी मिळाली आहे. भारतात फिरकीपटूंची मोठी खाण असल्यामुळे अक्षरला पुरेशा संधी देखील मिळाल्या नाहीत. त्यामुळेच अक्षर पटेल काहीसा मागे राहिला. त्याचबरोबर अक्षर पटेल हा जडेजाच्या सावलीत राहिल्यामुळे संधी आणि प्रसिद्धीपासून वंचित राहिला. मात्र नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्यांने आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं आहे.
भारतीय संघाकडे रवींद्र जडेजाच्या रुपात आधीच एक डावखुरा (फिरकी) अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे अक्षर पटेलला भारतीय संघात पुरेशा संधी मिळण्यासाठी वाट पाहावी लागली आहे. परंतु, त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्याने संधीचं सोनं केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला २०२१ मध्ये भारतात खेळवण्यात आलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली. रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त असल्यामुळे अक्षर पटेलसाठी भारताच्या कसोटी संघाचे दरवाजे उघडले होते. त्या संधीचं त्याने अक्षरशः सोनं केलं. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन सामन्यांमध्ये अक्षरचा भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात समावेश करण्यात आला होता. त्यापैकी पहिल्याच सामन्यात त्याने ७ बळी टिपले. दुसऱ्या सामन्यात ११ बळी घेत त्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. तिसऱ्या सामन्यात त्याने पुन्हा ९ बळी घेत अवघ्या तीन सामन्यांमध्ये २७ बळी टिपले. त्याला माहिती होतं की आपल्याला ही संधी उशिरा मिळाली आहे, मात्र त्याने त्या संधीचं सोनं केलं
अक्षर पटेल सध्या ३० वर्षांचा आहे. त्याने वयाच्या २० व्या वर्षी टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र या १० वर्षांमध्ये त्याला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून केवळ १३१ सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. अक्षरने २०१४ मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये आणि भारताच्या एकदिवसीय संघात पदार्पण केलं. २०१५ मध्ये त्याला भारताच्या टी-२० संघात स्थान मिळालं. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्याचं भारतीय संघातलं स्थान कधीच पक्कं झालं नाही. आजही तो किमान एका तरी प्रकारात भारतीय संघाचा पूर्णवेळ सदस्य होण्यासाठी धडपडताना दिसतोय. अक्षर पटेल चेंडू हातभर वळवत नाही, ना त्याच्याकडे गुगलीचं तंत्र आहे. तो केवळ यष्टीसमोर गोलंदाजी करत राहतो आणि हीच त्याची मोठी ताकद आहे.
हे ही वाचा >> IPL मधील ‘त्या’ सामन्यानंतर ढसाढसा रडणारा, आतून कोलमडलेल्या कुल’दीप’ने कसं केलं पुनरागमन?
दुसरा जडेजाज जणू….
अक्षर पटेल इंडियन प्रीमियर लीगमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आला आहे. मात्र भारतीय संघात त्याचं स्थान पक्कं होऊ शकलं नाही. जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू संघात असल्यामुळे अक्षर मागे राहिला. कारण जडेजा जे-जे करू शकतो त्या-त्या गोष्टी अक्षरही करू शकतो. दोघांनाही चेंडू फार वळवता येत नाही, दोघेही विकेट-टू-विकेट (यष्टीसमोर) गोलंदाजी करतात, दोघांचंही क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं आहे, दोघेही खालच्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करतात, दोघांचाही फिटनेस उत्तम आहे. त्यामुळे संघात दोघांपैकी केवळ एकालाच संधी मिळू शकते. अनुभवामुळे ती संधी जडेजाला मिळत राहिली आहे. तर अक्षर नेहमी संधीच्या प्रतीक्षेत राहिला.
शांत, संयमी अक्षर अपयशाने खचून जात नाही
२१ मे २०१६ रोजी रायजिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामन्यातील अखेरच्या षटकांत पुण्याच्या संघाला विजयासाठी २३ धावांची आवश्यकता होती. पुण्याचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी खेळपट्टीवर उभा होता. त्याचवेळी पंजाबच्या कर्णधाराने चेंडू अक्षरकडे सोपवला. मात्र त्या सामन्यात धोनीने अक्षरच्या गोलंदाजीवर २३ धावा वसूल करत सामना पंजाबच्या हातून हिसकावला. या अपयशानंतरही अक्षर पटेल खचून गेला नाही. त्याने पुढच्या सामन्यात उत्तम गोलंदाजी करून पुनरागमन केलं.
भारतीय संघातला ‘बापू’
अक्षर हा भारतीय संघातला गुणी मुलगा आहे. फलंदाजीत तो रोहित-पांड्यासारखा मोठा फटकेबाज नाही, गोलंदाजीत तो अश्विन-कुलदीपसारखा उच्च दर्जाजा फिरकीपटू नाही. मात्र तो यष्टीसमोर सातत्याने गोलंदाजी करत राहतो. तो त्याची चार षटकं मन लावून गोलंदाजी करतो. तर, फलंदाजीत संधी मिळेल तेव्हा आणि मिळेल त्या क्रमांकावर योगदान देण्याचा प्रयत्न करतो. अलीकडच्या काळात त्याच्या फलंदाजीत बरीच सुधारणा झाली आहे. तो उत्तम गतीने धावा जमवू लागला आहे. खालच्या क्रमांकावर चांगले फटके लगावताना दिसतोय.
हे ही वाचा >> VIDEO: दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूचं सूर्याच्या कॅचवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “बाऊंड्री कुशन हललं, पण…”
अक्षरला फार चांगलं इंग्रजी बोलता येत नाही. तो भारतीय संघातला शुद्ध देसी आणि गुणी मुलगा आहे. तो इतका गुणी आहे की त्याचे मित्र त्याला बापू (महात्मा गांधींच्या नावावरून) म्हणतात. तो मैदानावरही त्याच्या मित्रांनी दिलेल्या या नावाला साजेसा वागतो. उगाच आक्रमकता दाखवत नाही, स्लेजिंग करत नाही, त्याचं केवळ त्याच्या कामावर लक्ष असतं. तो त्याच्या चार षटकांमध्ये कमीत कमी धावा देतो. परिणामी भारतीय संघाचं जसप्रीत बुमराहवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत मिळते. बुमराहवरील दबाव कमी होतो.