Azam Khan Eating Fast Food Video Viral : टी-२० विश्वचषक २०२४ मधील १९ वा सामना ९ जून रोजी भारत-पाकिस्तान संघात खेळला गेला. या सामन्यात रोहितच्या नेतृत्वाखालील संघाने बाबर आझमच्या संघाचा ६ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानसमोर १२० धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ११३ धावांच करु शकला. या सामन्यानंतर पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज आझम खानचा नवा व्हिडीओ सोशल प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो स्टॉलवर फास्ट फूड खाताना दिसत आहे. ज्याच्यावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन त्याची खिल्ली उडवत आहेत.
पाकिस्तानच्या आझम खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका स्टॉलवर फास्ट फूड खाताना दिसत आहे. आझम खान हा त्याच्या फिटनेसमुळे सतत ट्रोल होत असतो. आता आझम खान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा लोकांच्या निशाण्यावर आला आहे. आझम खान पाकिस्तानच्या टी-२० विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. मात्र, तो गोल्डन डकवर बाद झाला. यानंतर भारताविरुद्धच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते.
आझम खानच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या मजेशीर कमेंट्स –
पाकिस्तान संघ सुपर-८ मध्ये कसा पोहोचेल?
पाकिस्तानला येथून सुपर-८ मध्ये आपले स्थान पक्के करायचे असेल तर त्याला आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावेच लागतील. फक्त इतकेच नाही तर त्याचबरोबरर हे सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. कारण पाकिस्तानचा नेट रन रेट सध्या मायनसमध्ये आहे. अमेरिकेचा नेट रन रेट सध्या चांगला आहे. अशा स्थितीत बाबर आझम अँड कंपनीला हे दोन्ही सामने जिंकून नेट रन रेट सुधारावा लागेल. अन्यथा त्यांची डाळ शिजणार नाही.
पाकिस्तानला भारताच्या उपकाराची गरज –
सुपर-८ मध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तान संघाला भारताच्या उपकाराची गरज आहे. भारताच्या विजयासाठी प्रार्थना केल्याशिवाय पाकिस्तान संघ साखळी टप्प्यातून पुढील फेरी गाठू शकत नाही. आता भारताला १२ जूनला अमेरिकेशी आणि १५ जूनला कॅनडाचा सामना करायचा आहे. भारताने हे दोन्ही सामने जिंकावेत, अशी प्रार्थना पाकिस्तानला करावी लागेल. याशिवाय, अमेरिकेला पराभूत करण्याबरोबरच भारतीय संघाने त्यांचा नेट रन रेटही मोठ्या फरकाने पराभूत करून खराब केला पाहिजे, अशी त्यांची इच्छा आहे. असे जर झाले तरच त्याचा थेट फायदा पाकिस्तानला मिळेल