Imad Wasim to miss match against USA : पाकिस्तान क्रिकेट संघ ६ जून रोजी विश्वचषकातील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पाकिस्तानचा पहिला सामना यजमान अमेरिकेशी होणार आहे. विश्वचषकात पुन्हा एकदा पाकिस्तान संघाची कमान बाबर आझमच्या हाती आली आहे. त्याचवेळी सलामीच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. संघाला या अष्टपैलू खेळाडूची उणीव भासू शकते.
इमाद वसीम पहिल्या सामन्यातून बाहेर –
पाकिस्तान क्रिकेट संघाला अष्टपैलू इमाद वसीमच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. इमाद वसीम साइड स्ट्रेनच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. पहिल्या सामन्याला मुकल्यानंतर इमाद पुढच्या सामन्यात खेळताना दिसेल अशी आशा संघाला आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने इमाद वसीमच्या अनुपस्थितीची पुष्टी केली आहे. बाबर म्हणाला की, आम्हाला आशा आहे की पहिल्या सामन्याला मुकल्यानंतर इमाद पुढील काही सामन्यांमध्ये खेळताना दिसेल.
नुकताच पाकिस्तानचा संघ ४ सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या मालिकेच्या मध्यभागी अष्टपैलू इमाद वसीम सराव करताना जखमी झाला होता. त्याच्या बरगडीत दुखत होते, त्यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. टी-२० विश्वचषक स्पर्धेत तो खेळेल अशी अपेक्षा होती, मात्र आता कर्णधार बाबर आझमने पहिल्याच सामन्यातून बाहेर पडणार असल्याची माहिती दिली आहे.
काय म्हणाला बाबर आझम?
यजमान अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानच्या सलामीच्या सामन्यापूर्वी मीडियाशी बोलताना बाबर म्हणाला, ‘इमाद वसीमला साईड स्ट्रेनची दुखापत झाली आहे. परंतु, पहिल्यापेक्षा लक्षणीय सुधारणा झाली आहे. आमची मेडिकल पॅनलशी चर्चा झाली आहे, त्यामुळे मला वाटतं पुढच्या सामन्यासाठी नाही, पण बाकीच्या सामन्यासाठी तो संघाचा भाग असेल.’ इमाद सलामीच्या सामन्यातून बाहेर असेल का? या प्रश्नावर बाबर आझमने ‘हो’ म्हटलं आहे.
टी-२० विश्वचषक २०२४साठी पाकिस्तानचा संघ :
बाबर आझम (कर्णधार), आझम खान, फखर जमान, अबरार अहमद, हारिस रौफ, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, मोहम्मद अमीर, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, शादाब खान, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान, सॅम अयुब.
© IE Online Media Services (P) Ltd