Virender Sehwag criticizes Babar Azam : टी-२० विश्वचषक २०२४ मधील पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रवास आता संपला आहे. हा विश्वचषक पाकिस्तानसाठी खूपच वाईट राहिला आहे. साखळी सामन्यांनंतरच पाकिस्तानचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला होता. पाकिस्तान संघाने या विश्वचषकातील खराब कामगिरीने चाहते आणि माजी क्रिकेटपटूंची मोठी निराशा केली आहे. यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खराब कामगिरीनंतर बाबर आझमला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता टीम इंडियाच्या माजी दिग्गज क्रिकेटरने बाबर आझमवर जोरदार टीका केली आहे.
वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
टी-२० विश्वचषकात पाकिस्तानची संघाची फलंदाजी अत्यंत खराब राहिली. पाकिस्तान संघाची फलंदाजी मुख्यतः कर्णधार बाबर आझमवर अवलंबून असते. मात्र, बाबर आझमची या मोसमात कामगिरी काही विशेष झाली नाही. बाबर संघासाठी विशेष काही करू शकला नाही. आता, पाकिस्तान संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने त्याच्यावर सडकून टीका केली आहे.
‘बाबर पाकिस्तानी संघासाठी लायक नाही’
क्रिकबझवर बाबर आझमबद्दल बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, “बाबर आझम षटकार मारणारा फलंदाज नाही. मी त्याला कधीही वेगवान गोलंदाजांविरुद्ध पायाचा वापरताना पाहिले नाही. मला वाटते एक लीडर म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे. आता त्याने स्वतः खालच्या क्रमांकावर फलंदाजी करावी. त्याचबरोबर दुसऱ्या चांगल्या फलंदाजाला वरच्या फळीत फलंदाजीसाठी पाठवावे. कारण पाकिस्तान संघाचा कर्णधार बदलला तर बाबर आझम टी-२० संघात स्थान मिळवण्यासाठी सुद्धा लायक नाही.”
टी-२० विश्वचषक २०२४ मधील पाकिस्तानची कामगिरी –
बाबर आझमच्या पाकिस्तानसाठी टी-२० विश्वचषक २०२४ खूप वाईट गेला. पाकिस्तान संघाला ४ पैकी २ साखळी सामने जिंकता आले आणि २ सामन्यात पराभव पत्करावा लागला. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला यजमान अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर या संघाची खूप खिल्ली उडवली गेली, कारण पाकिस्तानच्या तुलनेत अमेरिकेचा संघ खूपच कमकुवत मानला जातो. यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाला. यानंतर पाकिस्तानने कॅनडा आणि आयर्लंडविरुद्ध विजय मिळवला होता, मात्र पाकिस्तानी संघ सुपर ८ मध्ये स्थान मिळवू शकला नाही.