SL vs BAN T20 World Cup 2024 Highlights: श्रीलंका आणि बांगलादेश या कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यातील सामन्यात टी-२० विश्वचषकात पहिल्यांदाच बांगलादेश संघाने लंकेचा पराभव केला आहे. बांगलादेशने एक षटक आणि २ विकेट्स राखून मोठा विजय मिळवला आहे. बांगलादेशचा सर्वात अनुभवी खेळाडू महमदुल्लाहने संघाला मोठ विजय मिळवून दिला. श्रीलंकेनेही चांगली टक्कर दिली पण धावसंख्या कमी असल्याने संघाला हार मानावी लागली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने ८ बाद १२५ धावा करत रोमहर्षक विजय मिळवला.
अखेरच्या चार षटकांमध्ये बांगलादेशला १७ धावांची आवश्यकता होती. १६७ व्या षटकात पाथिरानाने शाकिबला बाद करत ३ धावा दिल्या. तर १८ व्या षटकात नुवान तुषाराने कमाल करत दोन विकेट्स मिळवत बांगलादेशच्या धावांना ब्रेक लावला आणि अवघ्या ३ धावा दिल्या. आता शेवटच्या दोन षटकात विजयसाठी ११ धावांची आवश्यकता होती. शनाका गोलंदाजीसाठी आला आणि त्याच्या १९ व्या षटकातील पहिल्याच चेंडू त्याने फुल टॉस टाकल्याने महमुदुल्लाह षटकार खेचला आणि सामना आपल्या बाजून वळवला. तुषारा आणि पाथिरानाच्या षटकानंतर बांगलादेशला धावा करणे अवघड होते. पण मात्र या षटकाराने बांगलादेशला मोठा विजय आपल्या नावे करता आला.
१२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात फारशी खास झाली नाही. त्यांनी आपले दोन्ही सलामीवीर ६ धावांत गमावले. यानंतर लिटन दासने डावाची धुरा सांभाळली, त्याने ३८ चेंडूत ३६ धावा केल्या आणि एका टोकाला पाय रोवून उभा राहत डाव सावरला. यानंतर तौहीद हृदयने आपल्या झंझावाती खेळीने लिटन दासला साथ दिली आणि या दोन्ही फलंदाजांच्या भागीदारीमुळे सामना बांगलादेशकडे वळवण्यात मोठी भूमिका बजावली.
तौहीदने २०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना केवळ २० चेंडूत ४० धावा केल्या. हृदयनेही आपल्या खेळीत ४ षटकार आणि १ चौकार लगावला. मात्र, अखेरीस श्रीलंकेने चांगले पुनरागमन केले. मात्र महमुदुल्लाहने षटकार ठोकत श्रीलंकेच्या आशा धुळीस मिळवल्या. महमुदुल्लाहने १६ धावांची नाबाद खेळी खेळली. श्रीलंकेकडून नुवान तुषाराने सर्वाधिक ४ विकेट घेतले. कर्णधार वानिंदू हसरंगाने २ विकेट्स मिळवले. धनंजय डी सिल्वा आणि मथिशा पाथिराना यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.