Bangladesh vs Netherlands T20 World Cup 2024 Highlights: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स सामन्यात एक विचित्र घटना घडली. नाणेफेक जिंकल्यानंतर नेदरलँड्सने बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दरम्यान, डच संघाचा व्हिव्हियन किंग्मा गोलंदाजी करत असताना त्याचा एक चेंडू बांगलादेशचा सलामीवीर तनजीद हसनच्या हेल्मेटच्या ग्रिलमध्ये जाऊन अडकला. या बाऊन्सर चेंडूवर फलंदाजाला दुखापत होऊ शकली असती, मात्र हेल्मेटच्या ग्रीलमुळे मोठी दुर्घटना टळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशच्या डावाच्या तिसऱ्या षटकात ही घटना घडली, जेव्हा विवियन किंग्मा डच संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी आला होता. किंग्माने षटकातील पहिल्या ४ चेंडूत १४ धावा दिल्या होत्या, परंतु त्याच दरम्यान त्याने पाचव्या चेंडूवर बाउन्सर टाकला. ताशी १३४ किमी वेगाने येणाऱ्या बाउन्सर चेंडूवर पुल शॉटसाठी तनजीदने बॅट फिरवली, पण चेंडू त्याच्या हेल्मेटच्या ग्रिलमध्ये जाऊन अडकला. जेव्हा रिप्ले दाखवला गेले तेव्हा दिसले की टप्पा पडल्यानंतर चेंडू खूप जोरात बाऊन्स झाला.

हेही वाचा – IND vs USA: “तू सूर्यकुमारला का आऊट नाही केलंस?”, नवज्योत सिंग सिद्धूने विचारलेल्या प्रश्नावर नेत्रावळकरने दिले उत्तर; म्हणाला- ‘त्याचा झेल…’

तनजीदने यानंतर लगेच हेल्मेट काढले आणि वैद्यकीय पथकही मैदानावर पोहोचले. प्रोटोकॉलनुसार तनजीदची तपासणी करण्यात आली आणि त्याच्या डोळ्यांचीही तपासणी करण्यात आली. सुदैवाने, त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. या सामन्यात तनजीदने २६ चेंडूत ३५ धावांची खेळी खेळली, त्यादरम्यान त्याने ५ चौकार आणि १ षटकारही लगावला.

तनजीदनंतर शाकिब अल हसननेही बांगलादेशसाठी अर्धशतक झळकावले. ६४ धावा करून तो नाबाद राहिला. त्याच्या या दमदार खेळीमुळे बांगलादेश संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून १५९ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. १६० धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करताना प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १३४ धावा करू शकला. संघाकडून सायब्रँड एंजेलब्रेक्टने ३३ धावा केल्या, तर कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने २५ धावा केल्या. बांगलादेशकडून राशिद हुसेनने सर्वाधिक ३ विकेट घेतले.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ban vs ned ball stuck in tanzid hasan helmet missed biggest injury video viral t20 world cup 2024 bdg
Show comments