बांगलादेश क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आपल्या हेकेखोर वृत्तीमुळे अनेकदा चर्चेत असतो. गुरूवारी नेदरलँडविरोधात झालेल्या सामन्यात शाकिबने बहारदार कामगिरी करत बांगलादेशचा विजय सुकर केला. सेंट विन्सेन्ट येथे झालेल्या सामन्यात बांगलादेशने २५ धावांनी नेदरलँड्सवर विजय मिळविला. शाकिबने या सामन्यात ४६ चेंडूत ६४ धावा केल्या. या विजयानंतर आयसीसी विश्वचषकाच्या गट ड मधून बांगलादेशने सुपर आठमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. या विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शाकिब अल हसनला वीरेंद्र सेहवागच्या टिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी शाकिबने दिलेले उत्तर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
खरंतर टी-२० विश्वचषकात शाकिब अल हसनची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली होती. पहिल्या दोन सामन्यात त्याला पुरेशा धावा करता आल्या नाहीत. तसेच गोलंदाजीत विकेटही मिळवता आल्या नाहीत. या सुमार कामगिरीवर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने टीका केली होती. शाकिबने अंतर्मुख होऊन आपल्या कामगिरीचा आढावा घ्यावा आणि निवृत्तीचा विचार करावा, अशी टिप्पणी सेहगाने केली होती.
दक्षिण आफ्रिकेकडून १० जून रोजी बांगलादेशला अवघ्या चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर क्रिकबझशी बोलत असताना सेहवागने शाकिब अल हसनला क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिला होता. “शाकिब संघातील एक ज्येष्ठ, अनुभवी खेळाडू आहे. तो काही काळ कर्णधारही राहिला होता. पण त्याने आता आत्मपरिक्षण करायला हवे. स्वतःचा सुमार खेळ टाळण्यासाठी शाकिबने टी-२० प्रकारातून आता निवृत्ती घ्यावी”, असे विधान केले होते.
यानंतर गुरुवारी नेदरलँडविरुद्ध बांगलादेशने २५ धावांनी विजय मिळविल्यानंतर शाकिब अल हसन पत्रकार परिषदेला सामोरा गेला. सेहवागने केलेल्या टीकेवर त्याला प्रश्न विचारण्यात आला. यावेळी शाकिबने पत्रकाराला मध्येच थांबवून कोण? असा प्रतिप्रश्न विचारला. शाकिब अल हसनला प्रश्न कळला होता. मात्र सेहवागला तो ओळखत नाही, अशा अर्विभावात त्याने उत्तर दिले. शाकिब अल हसनचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.