Bangladesh qualified for Super 8 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ मधील ३७व्या सामन्यात बांगलादेशने दमदार कामगिरी करत नेपाळचा २१ धावांनी पराभव केला. या विजयासह त्याने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने १०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ केवळ ८५ धावाच करू शकला. बांगलादेशसाठी घातक गोलंदाजी करताना तांझिम हसन शाकिबने ४ विकेट्स घेतल्या. नेपाळकडून कुशल मल्लाने सर्वाधिक २७ धावा केल्या.
बांगलादेशच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला नेपाळचा संघ १९.२ षटकांत ८५ धावा करून सर्वबाद झाला. नेपाळच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. कुशल मल्लाने ४० चेंडूत २७ धावा केल्या. दीपेंद्र सिंगने ३१ चेंडूत २५ धावा केल्या. सलामीवीर आसिफ शेख १७ धावा करून बाद झाला. त्याने ४ चौकार मारले. सलामीवीर कुशल भुरटेल अवघ्या ४ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे संघाला २१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
बांगलादेशची सुरुवात खराब झाली –
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर तांझिद हसनला सोमपाल कामीने बाद केले. तो खाते न उघडताच तंबूत परतला. यानंतर कर्णधार नझमुल हसन शांतोही केवळ चार धावा करून माघारी परतला. या सामन्यात बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला २० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. लिटन दासने १०, शाकीब अल हसनने १७, तौहादी हृदयाने ९, महमुदुल्लाहने १३, झाकेर अलीने १२, तांझिम हसन शाकीबने ३, रिशाद हुसेनने १३, मुस्तफिजुर रहमानने ३ आणि तस्किन अहमदने नाबाद १२ धावा केल्या. नेपाळकडून सोमपाल कामी, दीपेंद्र सिंग एरी, रोहित पौडेल आणि संदीप लामिछाने यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केला.
हेही वाचा – Super8 Explainer: वर्ल्डकपमधील सुपर८चे सामने कसे खेळवले जाणार? काय आहे A1, B2 चं गणित; जाणून घ्या सविस्तर
बांगलादेश सुपर ८ साठी पात्र –
बांगलादेशने नेपाळला हरवून सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. त्याने आतापर्यंत ४ सामने खेळले असून ३ जिंकले आहेत. यासोबतच एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेशचे ६ गुण आहेत. हा संघ ड गटात आहे. यासह दक्षिण आफ्रिका सुपर ८ मध्ये पोहोचली आहे. बांगलादेश सुपर ८ साठी पात्र ठरल्याने नेदरलँड्सचे स्वप्न भंगले आहे
सुपर८ साठी पात्र ठरलेले दोन्ही गटातील संघ
अ गट
A1 – भारत
B2 – ऑस्ट्रेलिया
C1 – अफगाणिस्तान
D2 – बांगलादेश
हेही वाचा – Team India : गौतम गंभीरचं नाव कोचपदासाठी शर्यतीत, राहुल द्रविडच्या जागी सांभाळणार टीम इंडियाची धुरा?
ब गट
A2 – अमेरिका
B1 – इंग्लंड
C2 – वेस्ट इंडिज
D1 – दक्षिण आफ्रिका