अॅडलेड : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल १२’ फेरीच्या सामन्यात भारताच्या विराट कोहलीने आभासी क्षेत्ररक्षण केल्याचा आरोप बांगलादेशचा यष्टीरक्षक-फलंदाज नुरुल हसनने केला आहे. पंच मरे इरॅस्मस आणि ख्रिस ब्राऊन यांनी कोहलीच्या कृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दंडात्मक स्वरूपात मिळणाऱ्या पाच धावांना बांगलादेशला मुकावे लागले असाही नुरुलचा दावा आहे.
ट्वेन्टी-२० विश्वचषकात बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशला डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार पाच धावांनी पराभूत केले होते. धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने अप्रतिम सुरुवात केली होती. मात्र, पावसानंतर बांगलादेशच्या फलंदाजांची लय बिघडली, तसेच भारताने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत विजय साकारला. भारताने आमच्यापेक्षा दर्जेदार खेळ केला आणि ते जिंकले, असे सामन्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन म्हणाला होता. मात्र, नुरुलने कोहलीवर आभासी क्षेत्ररक्षणाचा आरोप केला.
‘‘पाऊस थांबल्यावर सामन्याला पुन्हा सुरुवात झाली, तेव्हा मैदान ओले होते. याचा आम्हाला नक्कीच फटका बसला. तसेच भारताने आभासी क्षेत्ररक्षणही केले. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करताना आम्हाला पाच धावा मिळाल्या पाहिजे होत्या, पण तसे झाले नाही,’’ असे नुरुल म्हणाला.
हा सर्व प्रकार बांगलादेशच्या डावातील सातव्या षटकात झाला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बांगलादेशच्या लिटन दासने चेंडू उजवीकडे (ऑफला) पाठच्या दिशेला मारला. तो चेंडू सीमारेषेजवळील अर्शदीप सिंगने पकडला आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या दिशेने फेकला. मात्र, त्याच वेळी अर्शदीप आणि कार्तिकच्या मध्ये उभ्या असलेल्या कोहलीने चेंडू पकडून नॉन-स्ट्राइकवरील फलंदाजाच्या दिशेने फेकल्याचे भासवले. परंतु बांगलादेशच्या फलंदाजांचे कोहलीकडे लक्षही गेले नाही. त्यामुळे नुरुलच्या आरोपांवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच पंचांवरही अप्रत्यक्षपणे टीका केल्यामुळे नुरुलवर दंडात्मक कारवाई होऊ शकेल.
नियम काय सांगतो?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियम क्रमांक ४१.५ नुसार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फलंदाजाचे मुद्दाम लक्ष विचलित करणे, त्याला फसवणे किंवा आभास घडवून अडथळा आणण्यावर निर्बंध आहे. क्षेत्ररक्षकांनी यापैकी कोणतीही कृती केल्याचे आढळल्यास पंच तो चेंडू रद्द करू शकतात (डेड बॉल) आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा देऊ शकतात. परंतु बांगलादेशविरुद्ध कोहलीची कृती या नियमाच्या विरोधात होती असे पंचांना जाणवले नाही.