६ चेंडू ११ धावा. टी२० क्रिकेटमध्ये सहजी वाटणारं समीकरण. समोर फिरकीपटू. तीन फुलटॉस. अशा अनुकूल गोष्टी होऊनही बांगलादेशला टी२० वर्ल्डकपमध्ये विजयश्री खेचून आणता आली नाही. दक्षिण आफ्रिकेने अवघ्या ४ धावांनी विजय मिळवत सुस्कारा टाकला. न्यूयॉर्कच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेला ११३ धावाच करता आल्या. बांगलादेशचा संघ विजयपथावर होता. मात्र हाणामारीच्या षटकात चौकार आणि षटकार मारण्याची हातोटी नसल्याने बांगलादेशला समीप येऊनही विजय गवसला नाही.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने पाकिस्तानला नमवलं होतं तर अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवलं होतं. या यादीत आता आफ्रिकेची भर पडण्याची शक्यता होती. टी२० वर्ल्डकपच्या इतिहासात आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात तीन लढती झाल्या होत्या. तिन्हीमध्ये दक्षिण आफ्रिकेनेच बाजी मारली होती. तो इतिहास कायम राहिला. रविवारी याच खेळपट्टीवर भारत आणि पाकिस्तान सामना झाला होता. भारतीय संघाने ११९ धावांचा यशस्वी बचाव केला होता. गोलंदाजांना पोषक अशा खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणं अतिशय कठीण मानलं जात आहे.
स्पर्धेत या मैदानावर झालेल्या लढतींचा इतिहास माहिती असूनही दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी स्वीकारली. पहिल्याच षटकात तान्झिम सकीबने रीझा हेन्ड्रिक्सला माघारी धाडलं. तो भोपळाही फोडू शकला नाही. तिसऱ्या षटकात तान्झिमनेच क्विंटनला त्रिफळाचीत केलं. पुढच्या षटकात तास्किन अहमदने आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमला तंबूचा रस्ता दाखवला. पाठोपाठ युवा ट्रिस्टन स्टब्सही भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला. दक्षिण आफ्रिकेची स्थिती २३/४ अशी झाली. यानंतर डेव्हिड मिलर आणि हेनरिच क्लासन यांनी पाचव्या विकेटसाठी ७९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या दोघांनी एकेरी-दुहेरी धावांचा रतीब घालतानाच चौकार-षटकारही लगावले. या भागीदारीमुळेच आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. तास्किनने क्लासनला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पुढच्याच षटकात डेव्हिड मिलर रिषाद हुसेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला ११३ धावांचीच मजल मारता आली. बांगलादेशकडून तान्झिमने ३ तर तास्किनने २ विकेट्स पटकावल्या.
या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना तांझिड हसनने दोन चौकारांसह आक्रमक सुरुवात केली पण कागिसो रबाडाने त्याला बाद केलं. कर्णधार शंटो आणि लिट्टन दास डाव सावरला. केशव महाराजने लिट्टनला मिलरकडे झेल देण्यास भाग पाडलं. प्रचंड अनुभवी शकीब अल हसनकडून बांगलादेशला मोठ्या अपेक्षा होत्या. पण अवघ्या ३ धावा करुन शकीब माघारी परतला. अँनरिक नॉर्कियाने त्याला बाद केलं. नॉर्कियानेच शंटोलाही बाद केलं. यानंतर महमदुल्ला आणि तौहिद हृदॉय यांनी पाचव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. तौहिदला रबाडाने पायचीत केलं. त्याने ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. महमदुल्ला हा बांगलादेशचा आशास्थान होता. जेकर अली ८ धावा करुन तंबूत परतला.
अंतिम षटकात बांगलादेशला ११ धावांची आवश्यकता होती. पहिला चेंडू वाईड ठरला. पुढच्या चेंडूवर महमदुल्लाने एक धाव काढली. जेकर अलीला बाद करत महाराजने आफ्रिकेला पुनरागमनाची संधी दिली. चौथ्या चेंडूवर लेगबायची एक धाव मिळाली. पाचव्या चेंडूवर फुलटॉसवर महमदुल्लाने जोरदार फटका लगावला पण एडन मारक्रमने सीमीरेषजवळ काटेकोरपणे झेल टिपत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अंतिम चेंडूवर बांगलादेशला ६ धावांची आवश्यकता होती पण तास्किन केवळ एकच धाव मिळवू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून महाराजने ३ तर रबाडा आणि नॉर्किया यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.