T20 World Cup Prize Money: भारतीय संघाने तब्बल ११ वर्षांचा दुष्काळ संपवून विश्वचषक उंचावला आहे. यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात करून जगज्जेतेपद पटकावलं आहे. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर आयसीसीकडून (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) टीम इंडियाला बक्षीस मिळालं आहेच, त्याचबरोबर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही टीम इंडियासाठी मोठ्या बक्षीसाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने टीम इंडियासाठी १२५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
जय शाह यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून जगज्जेत्या भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. तसेच त्यांच्यासाठी १२५ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा करतान आनंद होत असल्याचं वक्तव्य केलं आहे. शाह यांनी म्हटलं आहे की टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत असाधारण कामगिरी केली आहे. त्यांनी या स्पर्धेत त्यांची प्रतिभा आणि दृढनिश्चय दाखवला, त्यांनी खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं, या अनन्यसाधारण कामगिरीसाठी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचं अभिनंदन
दरम्यान, आयसीसीकडूनही टीम इंडियाला मोठं बक्षीस मिळालं आहे. आयसीसीने टी-२० विश्वचषकासाठी अंदाजे ९३.५ कोटी रुपये वितरित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला टी-२० विश्वचषक २०२४ चं विजेतेपद पटकावल्याबद्दल बक्षीस म्हणून २०.३६ कोटी रुपये मिळाले आहेत. तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेचा संघालाही बक्षीस म्हणून १०.६४ कोटी रुपये मिळाले आहेत. तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांनाही आयसीसीने बक्षीस जाहीर केलं आहे. या संघांना (इंग्लंड आणि अफगाणिस्तान) प्रत्येकी ६.५५ कोटी रुपये, तर सुपर आठ फेरीपर्यंत पोहोचलेल्या संघांना प्रत्येकी ३.१८ कोटी रुपये मिळाले आहेत. ग्रुप स्टेजमधील प्रत्येक सामना जिंकल्याबद्दल २५.९ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
हे ही वाचा >> IPL मधील ‘त्या’ सामन्यानंतर ढसाढसा रडणारा, आतून कोलमडलेल्या कुल’दीप’ने कसं केलं पुनरागमन?
टी-२० विश्वचषक २०२४ च्या मधील बक्षीसांची रक्कम (ICC कडून)
विजेता – २०.३६ कोटी रुपये
उपविजेता – १०.६४ कोटी
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना – ६.५५ कोटी रुपये
सुपर ८ फेरीपर्यंत पोहोचलेल्या संघांना – ३.१८ कोटी रुपये
९ ते १२ व्या क्रमांकावर असलेल्या संघांना – २.०६ कोटी रुपये
१३ ते २० व्या क्रमांकावर असलेल्या संघांना – १.८७ कोटी रुपये
प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला बोनस – २६ लाख रुपये