Sreesanth criticism of Riyan Parag : रियान पराग हा भारताच्या त्या युवा खेळाडूंपैकी एक होता, ज्यांनी आयपीएल २०२४ मध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीमुळे त्याची टीम इंडियात निवड होईल, अशी चर्चा रंगू लागली होती. ज्यामध्ये अनेक क्रिकेट तज्ज्ञांना त्याला टी-२० विश्वचषकात खेळताना पाहायचे होते. मात्र, तसे होऊ शकले नाही. कारण संघात फक्त १५ लोकांसाठी जागा होती आणि बरेच खेळाडू आधीच त्याचा भाग होते. त्यानंतर याच रियान परागला टी-२० विश्वचषकबाबत एका कार्यक्रमात प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने वादग्रस्त उत्तर दिले होते. ज्यावर आता माजी खेळाडू श्रीसंतने टीका करत एक महत्त्वाचा सल्ला दिला.

रियान परागवर श्रीसंत संतापला –

स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात रियान परागला विश्वचषकाबाबत विचारले असता त्याने सांगितले होते की, तो टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा भाग नाही, त्यामुळे विश्वचषक पाहत नाही. त्याची संघात निवड झाल्यावर पाहणे सुरू करेल. त्याच्या बोलण्याने भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंत दुखावला गेला. आता भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर एस श्रीसंतने रियानच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. रियानच्या बोलण्याने तो चांगलाच रागावलेला दिसत होता.

‘…अशा खेळाडूंनी आधी देशभक्त व्हावे’ –

तो नाव न घेता म्हणाला की, “काही तरुण खेळाडू म्हणतात की, त्यांची निवड झाली नसल्याने ते वर्ल्डकप पाहणार नाहीत. अशा खेळाडूंनी आधी देशभक्त व्हावे,” असा सल्ला श्रीशांतने दिला. त्याच्या मते, कोणत्याही खेळाडूसाठी आधी देशभक्त आणि नंतर क्रिकेटप्रेमी असणे महत्त्वाचे आहे. ज्यांनी संघ निवडला आहे, त्यांना आपण मनापासून पाठिंबा दिला पाहिजे.

हेही वाचा – Team India : विराट कोहलीने पंतप्रधानांचे मानले आभार; म्हणाला, “आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुम्ही मला नेहमीच…”

रियानने निवड होताच चाहत्यांवर साधला निशाणा –

रियान परागने महिनाभरापूर्वी विश्वचषकाबाबत वक्तव्य केले होते, ज्यावेळी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली नव्हती. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या निवड समितीने त्याची टीम इंडियामध्ये निवड केली आहे. आता पराग प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण आणि कर्णधार शुबमन गिलसह या दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. त्याची निवड होताच त्याने आता चाहत्यांवर निशाणा साधला आहे. परागने ईएसपीएन क्रिकइन्फोवर दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, लोक ‘स्विच’प्रमाणे बदलतात. जे लोक त्याला आधी ट्रोल करायचे, आता त्याच लोकांना टीम इंडियामध्ये बघायचे आहे.

हेही वाचा – टीम इंडियाचा निरोप घेताना राहुल द्रविड यांचे हृदयस्पर्शी भाषण, बीसीसीआयने शेअर केला ड्रेसिंग रूममधील भावनिक VIDEO

रियान पराग हा वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशा वागण्यामुळे त्याला चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केले होते. याबाबत परागने स्वत: आयपीएल दरम्यान कबूल केले होते की त्याला अशा समस्यांचा सामना करावा लागला होता. जी त्याने नंतर सुधारली होती. आता या वक्तव्यानंतर चाहत्यांनी पुन्हा एकदा त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.