टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३९ वा सामना इंग्लंड आणि श्रीलंका संघात खेळला जात आहे. या श्रीलंकेविरुद्धच्या करो या मरोच्या सामन्यात इंग्लंडचा संघ प्रथम गोलंदाजी करत आहे. मात्र, या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अष्टपैलू बेन स्टोक्स वेगवान गोलंदाज मार्क वुडला खुर्चीवरुन खाली ढकलताना दिसत आहे.
खरंतर, हा व्हिडिओ सामन्या आधी झालेल्या फोटोशूटचा आहे, ज्यामध्ये सर्व खेळाडूंना खुर्चीवर बसून ग्रुप फोटो काढायचा होता, पण त्याआधी मार्क वुड आणि बेन स्टोक्स यांच्यात हे मजेदार कृत्य पाहायला मिळाले. या 29 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, आधी मार्क वुड शेवटच्या खुर्चीवर बसला आहे आणि नंतर जेव्हा स्टोक्स येऊन त्याच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसतो, तेव्हा तो मुद्दाम जमिनीवर पडतो.
यानंतर, जेव्हा वुड पुन्हा खुर्चीवर बसला तेव्हा त्याने स्टोक्सच्या खांदा मारुन पाडण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. प्रत्युत्तरात स्टोक्सने त्याला खांद्याने धक्का दिला तेव्हा तो एका दणक्यात खाली पडला. या संपूर्ण घटनेने व्हिडिओमध्ये खेळाडू हसताना दिसत आहेत आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांनाही आवडला आहे.
हेही वाचा – स्कॉटलंडचा अष्टपैलू खेळाडू कॅलम मॅक्लिओड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
या सामन्याबद्दल बोलायचे तर इंग्लंडसाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे. जर इंग्लिश संघ श्रीलंकेकडून पराभूत झाला, तर ते स्पर्धेतून बाहेर पडतील आणि ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. पण जर इंग्लंड जिंकला तर ऑस्ट्रेलिया बाहेर पडेल आणि इंग्लंड सेमीफायनल खेळताना दिसेल.