टीम इंडियाचा गुरुवारी (१० नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२२ मधील प्रवास आज इथेच संपला. इंग्लंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात भारताला तब्बल १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर १३० कोटी भारतीय जनतेची निराशा झाली. सोबतच संघातील खेळाडू देखील चांगलेचं नाराज असल्याचे पाहायला मिळाले. याला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा देखील अपवाद नव्हता. यावर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी भारतीय संघाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांनी टीम इंडियाची खिल्ली उडवली आणि म्हटले की, “पाकिस्तानचे खेळाडू बिलियन डॉलर लीगच्या क्रिकेटपटूंपेक्षा चांगले आहेत. ऑस्ट्रेलियात आल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे व्यक्त केले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे रमीज राजा यांनी भारतीय संघाच्या पराभवानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आपण स्वत:वर संशय घेत असतो. तुम्ही पाहा की, जागतिक क्रिकेट किती मागे राहिलंय आणि पाकिस्तान किती पुढे निघाला आहे. तुम्ही पाहा, या विश्वचषकात दिसेल की, बिलियन डॉलर इंडस्ट्री असणारे संघही मागे राहिले आहेत आणि आम्ही पुढे गेलो आहोत. अशात आम्ही कुठेतरी चांगलं काम करत आहोत. त्यामुळे तुम्हीही आनंद साजरा करा आणि आदर करा. याच संघातून मागील महिन्यात तीन खेळाडू आयसीसीचे सर्वोत्तम खेळाडू निवडले गेले आहेत.”
बाबरचा संघ आत्मविश्वासाने भरलेला
बाबर आझमचा आजचा पाकिस्तान संघ आणि इम्रान खानचा १९९२चा विश्वचषक विजेता संघ यांच्यातील साम्य पाहून मला आश्चर्य वाटते, असेही राजा म्हणाले. ते म्हणाले की, “बाबरच्या संघात ९२च्या संघासारखाच आत्मविश्वास आहे. संघ विजयासाठी मेहनत घेत आहे. १९९२च्या विश्वविजेत्या संघाची विचारसरणीही अशीच होती. विरोधी संघ १५ खेळाडूंसह खेळला तरी आम्ही हरणार नाही, हे आम्हाला माहीत होते. राजाने मात्र कबूल केले की बाबर ब्रिगेड इम्रान खानच्या १९९२ च्या विश्वचषक विजेत्या संघापेक्षा अधिक आरामशीर दिसत होता.