आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मधील गट-२चा सामना गुरुवारी पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला गेला. जो झिम्बाब्वेने एका धावेने जिंकला. पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती आणि झिम्बाब्वेचा ब्रॅड इव्हान्स गोलंदाजी करत होता. नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभा असलेला मोहम्मद वसीम ज्युनियर चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीझच्या बाहेर गेला होता.
मोहम्मद वसीम ज्युनियरला इव्हान्सने धावबाद केले नसले तरी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने एका महत्त्वाच्या मुद्द्यावर अगदी अचूक मत मांडले आहे.
ब्रॅड हॉगने शेवटच्या चेंडूचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘चेंडू टाकण्यापूर्वी क्रीझ सोडून जाणाऱ्या फलंदाजांना मोठा दंड का असावा? काल रात्री झालेल्या सामन्यातील शेवटचा चेंडू. अलीकडेच भारताच्या दीप्ती शर्माने इंग्लंड दौऱ्यावर अशाच प्रकारे चार्ली डीनला बाद केले होते, ज्यावरून बराच गदारोळ झाला होता.
आयसीसीने मांकडिंगबाबत नियम बदलले आणि अशा प्रकारे बाद झालेल्या फलंदाजांची गणना चुकीच्या खेळात न करता रनआउटमध्ये करण्यात आली. मांकडिंगबाबत नियम बदलले आहेत, पण दृष्टीकोन अजून बदललेला नाही. किंबहुना, चेंडू फेकण्याआधी नॉनस्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाने क्रिझ सोडले आणि गोलंदाजाने बाद केले, तर तो मांकडिंग रनआउट आहे. यापूर्वी हे खेळ भावनेच्या विरुद्ध मानले जात होते, परंतु आयसीसीने आता याला रनआउट म्हटले आहे.