टी-२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२ चे सामने आजपासून सुरू झाले आहेत. पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव केला. या विजयापेक्षा ग्लेन फिलिप्सने घेतलेला झेलच जास्त भाव खाऊन गेला. सध्या सोशल मीडियावर त्याने घेतलेल्या झेलची चर्चा सुरु आहे.
गेल्या वर्षी या दोन संघांमध्ये टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. न्यूझीलंडने त्यांच्यासमोर विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ १७.१ षटकात १११ धावांवर आटोपला.
ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुसऱ्याच षटकात बाद झाला. कर्णधार अॅरॉन फिंच आणि मिचेल मार्श यांनाही चांगली कामगिरी करता आली नाही. यानंतर खेळपट्टीवर उतरलेले ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिसही झगडत होते.
ग्लेन फिलिप्सने घेतला अदभूत झेल –
९ व्या षटकात स्टॉइनिसने हात मोकळे करण्याचा प्रयत्न केला. त्याने मिचेल सँटनरविरुद्ध षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कव्हवरुन शॉट मारण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्ररक्षण करण्यासाठी असलेल्या ग्लेन फिलिप्सपासून चेंडू खूप दूर होता. त्याने उजवीकडे धावत असताना हवेत उडी मारली आणि झेल पकडला. फिलिप्सने झेल घेण्यासाठी २९ मीटरचे अंतर कापले. या स्पर्धेत अजून बरेच सामने खेळायचे आहेत, पण ग्लेन फिलिप्सचा हा झेल ‘कॅच ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून ओळखला जात आहे. स्टॉइनिसने १४ चेंडूत केवळ ७ धावा केल्या.
न्यूझीलंडच्या फलंदाजांनी केला कहर –
न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पहिल्याच षटकापासून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. सलामीवीर फिन ऍलन १६ चेंडूत ४२ धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याने पहिल्या विकेटसाठी डेव्हॉन कॉन्वेसोबत २५ चेंडूत ५६ धावा जोडल्या. कॉन्वे शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने ५८ चेंडूत ९२ धावा केल्या. जिमी नीशमनेही १३ चेंडूत २६ धावा करत संघाची धावसंख्या २०० धावांपर्यंत पोहोचवली. ऑस्ट्रेलियाच्या सर्व गोलंदाजांनी ९ पेक्षा जास्त इकॉनॉमीने धावा दिल्या.