T20 World Cup 2024 WI vs SA : टी२० विश्वचषक २०२४ च्या सुपर ८ मधील एक सामना वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. सर व्हिवियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान वेस्ट इंडिजवर ३ विकेट्सने विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक मारली, यामुळे यजमान वेस्ट इंडिजचा विश्वचषकातील प्रवास आता संपला आहे. गट-2 मधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा दक्षिण आफ्रिका हा दुसरा संघ ठरला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजला १३५ वर रोखले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान पाऊस पडला आणि सामना थांबवण्यात आला. DLS नियमानुसार, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १७ षटकांत १२३ धावांचे लक्ष्य होते. जे दक्षिण आफ्रिकेने १६.२ षटकात ७ विकेट्स गमावून पूर्ण केले. पण या सामन्यादरम्यान एक भयंकर अपघाताची घटना पाहायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दोन गोलंदाजांमध्ये हा अपघात घडला. झेल घेताना संघातील रबाडा आणि मार्को यान्सन या दोन खेळाडूंमध्ये जोरदार टक्कर झाली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंना दुखापत झाली, ज्यामुळे वेदनेने कळवळत हे दोन्ही खेळाडू मैदानावर बसले. त्यामुळे सामना काही वेळ थांबवावा लागला. ज्यानंतर पंच आणि फिजिओ लगेच सीमेरेषेजवळ पोहोचले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

SA VS Wes T20 World Cup: दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये; यजमान वेस्ट इंडिज स्पर्धेबाहेर

रबाडा आणि मार्को यान्सनमध्ये जोरदार टक्कर

सामन्याच्या आठव्या षटकात वेस्ट इंडिजच्या फलंदाजाने एका चेंडूवर दमदार शॉट मारला. तो चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि कागिसो रबाडा व मार्को यान्सन तो चेंडू पकडण्यासाठी धावले. सीमारेषेजवळ गेल्यावर या दोन्ही खेळाडूंमध्ये चेंडू पकडण्याच्या नादात जोरदार टक्कर झाली; ज्यात रबाडाचे गुडघे मार्को यान्सनच्या पोटाला लागले. त्यामुळे मार्को बराच वेळ वेदनेने कळवळत मैदानात पडून राहिला. त्यानंतर सामना काही काळ थांबवावा लागला आणि फिजिओला मैदानात बोलावण्यात आले. मार्को यान्सनला तीव्र वेदना होत असल्याने त्याला मैदान सोडावे लागले.

वेस्ट इंडिजची १३५ धावांची मजल

या सामन्यात वेस्ट इंडिजची फलंदाजी फारशी चांगली झाली नाही. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत आठ गडी गमावून १३५ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून फलंदाजी करताना रोस्टन चेसने ४२ चेंडूंत सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान रोस्टन चेसने तीन चौकार व दोन शानदार षटकार ठोकले. मात्र, उर्वरित फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. त्याशिवाय तिसऱ्या विकेटसाठी काइल मेयर्स व रोस्टन चेस यांच्यात ६५ चेंडूत ८१ धावांची शानदार भागीदारी झाली. यावेळी आठव्या षटकात मेयर्सने एडन षटकार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू जोरात सीमेरेषेपलीकडे जात असताना कागिसो रबाडा आणि मार्को यान्सन यांनी तो पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळीच दोघांमध्ये जोरदार टक्कर झाली.

कागिसो रबाडा आणि मार्को यान्सन हे सीमेरेषेजवळ लाँग ऑन आणि लाँग ऑफवर चेंडू पकडण्याठी उभे होते. दोघांनाही वाटले ते हा चेंडू पकडू शकतील म्हणून त्यांनी हवेत उडी घेतली; ज्या नादात दोघे एकमेकांना धडकले. यावेळी रबाडाचे गुडघे यान्सनच्या पोटावर लागल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे यान्सन मैदानाबाहेर गेला. ज्यावेळी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ मैदानात उतरला. त्यानंतर त्यांनी १५ धावांवर दोन बळी गमावले आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. ज्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना स्टब्सने सर्वाधिक २९ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेसाठीही हा विजय तितकासा सोपा नव्हता. सतत पडणाऱ्या विकेट्समुळे आफ्रिका सामन्यात एका टप्प्यावर पिछाडीवर होती पण शेवटी संघाचा विजय झाला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collision between marco jansen and kagiso rabada during stop a six for south africa west indies vs south africa t20 world cup match south africa qualify for semi final sjr