Arshdeep Singh Trolled By Navjot Singh Sidhu: भारताचे माजी फलंदाज व काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट करून टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाला चिमटा काढला आहे. टी २० विश्वचषकात आज भारत विश्वविजेता होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. यंदाच्या टी २० विश्वचषक मोहिमेत भारतीय संघाच्या गोलंदाजांना जगभरातील क्रिकेट प्रेमी व तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. कुलदीप यादव, बुमराह, अक्षर पटेल तसेच दोन्ही अष्टपैलू खेळाडू जडेजा व पांड्याने सुद्धा कमाल कामगिरी केली आहे. भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगकडे तर आजच्या सामन्यात अवघ्या दोन विकेट्स घेऊन यंदाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होण्याचीही संधी आहे. अशावेळी सिद्धू यांनी नेमक्या कोणत्या गोलंदाजामध्ये १०० टक्के आत्मविश्वास आहे आणि स्किल मात्र शून्य आहे असं सांगणारा व्हिडीओ पोस्ट केलाय हे आपण जाणून घेऊया..
सिद्धू यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये, अर्शदीप सिंगने केलेल्या फलंदाजीवरून निशाणा साधला आहे. अर्शदीप सामन्याच्या वेळी फलंदाजी करताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता. पाकिस्तानी गोलंदाजाला चकवण्यासाठी त्याने चक्क स्टंप मोकळे ठेवले आणि स्टंपच्या एकदमच बाजूला उभा राहिला. चेंडू जसा जवळ आला तसा त्याने पूल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण बॅट आणि बॉलची भेट काही झालीच नाही आणि स्टंपच्या मागे उभ्या बाबर आझमने झेल घेतला.” या शॉटवरून खिल्ली उडवण्यासाठी “Confidence 100, Skill 0” असा टेक्स्ट व्हिडीओवर लिहिला आहे. हा व्हिडीओ तसा मीम पेजेसवर सुद्धा व्हायरल झाला होता पण स्वतः नवज्योतसिंग सिद्धू यांनी ही पोस्ट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
हा व्हिडीओ यंदाच्या टी २० विश्वचषकातील ग्रुप टप्प्यातील सामन्याचा आहे. आपल्या माहितीसाठी सांगायचं तर, सिद्धू संपूर्ण स्पर्धेत अर्शदीपच्या गोलंदाजीची स्तुती करत होते त्यामुळे याही व्हिडीओमधून टीका करणे हा हेतू असेल असं वाटत नाही. उलट मस्करी म्हणून हा व्हिडीओ शेअर केल्याचे दिसतेय.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत अर्शदीपला विकेट मिळाली नसली तरी अंतिम सामन्यात अर्शदीपकडून संघाला बऱ्याच अपेक्षा असतील. एका सामन्यानंतर बोलताना अर्शदीपने आपल्या यशाचे श्रेय वेगवान गोलंदाज बुमराहला दिले होते. अर्शदीप म्हणाला होता की, “माझ्या यशाचे बरेचसे श्रेय हे जस्सी भाई म्हणजे बुमराहला जाते कारण तो फलंदाजांवर खूप दबाव टाकतो. एका षटकात फार फार तर तीन किंवा चार धावा देतो. जेव्हा माझ्यासमोर अनुभवी फलंदाज उभे ठाकतात तेव्हा मी सुद्धा प्रत्येक चेंडू कसा बेस्ट असेल यावर लक्ष देतो असं केल्यानेच विकेट्स मिळण्याची शक्यता वाढते कारण त्यांना धावा वाढताना दिसत नाहीत व ते जोखीम पत्करतात. “
हे ही वाचा<< बुमराह रोहित शर्माच्या कर्णधारपदावर उघडपणे बोलला; IND vs SA मॅचसाठी कमी वेळ मिळण्यावरून म्हणाला, “साध्या गोष्टी पण..”
अर्शदीप सिंगच्या टी २० विश्वचषकातील कामगिरीवर प्रकाश टाकायचा झाल्यास, या तरुण गोलंदाजाने विश्वचषकात सात सामन्यांमध्ये ७.५० च्या इकॉनॉमी रेटसह १५ विकेट्स घेतल्या आहेत. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने फक्त ९ धावा देऊन चार विकेट्स घेतल्या होत्या. स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत टॉपला असणाऱ्या अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकीला (१७) मागे टाकण्यासाठी अर्शदीपला दोन विकेट्सची गरज आहे.