कर्णधार क्रेग एर्विनच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा यंदाच्या टी-20 विश्वचषकातील प्रवास शानदार राहिला. या स्पर्धेत संघाची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. झिम्बाब्वेने प्रथमच सुपर १२ फेरीत प्रवेश करून इतिहासच रचला नाही, तर टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला हरवून मोठा धमाका केला. झिम्बाब्वे संघाच्या यशात सर्वात महत्त्वाचा वाटा होता, तो अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाचा, ज्याने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. सध्याच्या टी-२० विश्वचषकात सिकंदरला ३ वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले. त्याचबरोबर कर्णधार क्रेग इर्विनने त्याला ३ घड्याळे भेट म्हणून दिली आहेत.
खरे तर जेव्हा झिम्बाब्वे संघ टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होत होता, तेव्हा सिकंदर रझा आणि क्रेग इर्विन यांनी एकमेकांना वचन दिले होते. ज्यामध्ये असे ठरले होते की, टी-२० विश्वचषक स्पर्धेत जो खेळाडू जितक्या वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ठरेल. तितक्या वेळा दुसरा खेळाडू ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरलेल्या खेळाडूला तेवढी घड्याळे खरेदी करुन भेट देईल. त्यानुसार सिकंदर रझा ३ वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला गेला तर क्रेग इर्विनला एकदा या पुरस्काराचा मानकरी ठरला.
रायन बर्लने घड्याळे देतानाचा फोटो केला शेअर –
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा खेळाडू रायन बर्लने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो फ्लाइटच्या आतमधील आहे, ज्यामध्ये क्रेग इर्विन सहकारी खेळाडू सिकंदर रझाला घड्याळे देताना दिसत आहे. यादरम्यान, इर्विन मुद्दाम निराश चेहऱ्याने दिसतो. बर्लने कॅप्शन लिहिले, ‘एक माणूस जो आपल्या शब्दांवर ठाम आहे. स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या सिकंदर रझासाठी कर्णधाराने तीन घड्याळे खरेदी केली.
सिकंदर रझाने टी-२० विश्वचषकात २१९ धावा केल्या –
पाकिस्तान वंशाच्या सिकंदर रझाने सध्याच्या टी-२० विश्वचषकात एकूण ८ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने सुमारे १४७ च्या स्ट्राइक रेटने एकूण २१९ धावा केल्या. गोलंदाजी करताना सिकंदरने आपल्या फिरकी गोलंदाजीने १० फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या जोरावर आता त्याला आयसीसीने जाहीर केलेल्या प्लेअर ऑफ द टूर्नामेंटसाठी नामांकन ही मिळाले आहे.