Shahid Afridi big statement on IPL : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी सध्या वेस्ट इंडिज आणि यूएसएच्या मैदानात टी-२० विश्वचषक २०२४ चा ॲम्बेसेडर म्हणून दिसत आहे. दरम्यान, त्याने एका पॉडकास्टवर मर्यादित षटकांचे क्रिकेट आणि विशेषतः फ्रँचायझी क्रिकेटवर चर्चा करताना आपले मत मांडले आहे. इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) जगभरातील फ्रँचायझी क्रिकेट लीग चालवणाऱ्या लोकांचे डोळे उघडले, असा त्याचा विश्वास आहे. क्रिकेट हा आता खेळाऐवजी व्यवसाय झाला आहे, असेही आफ्रिदी म्हणाला. हे असे विधान आहे जे काही क्रिकेट प्रेमींना दुखवू शकते.
क्रिकेट आता धंदा झालाय –
‘180 नॉट आऊट’ पॉडकास्टवर बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला, “पाहा आता पैसा आला आहे, परिस्थिती बदलली आहे. पूर्वी क्रिकेट हा खेळ होता, पण आता तो एक व्यवसाय झाला आहे. ते खूप ‘कमर्शियल’ आहे, जगात सर्वत्र लीग आयोजित केल्या जात आहेत. क्रिकेटमध्ये पैसा आहे, खरे सांगायचे तर आयपीएलने सर्व लीगचे डोळे उघडले आहेत.”
आफ्रिदीने सांगितले की, यापूर्वी काऊंटी क्रिकेटमध्येही पैसा होता, परंतु त्यासाठी खेळाडूंना ६ महिन्यांचा मोठा हंगाम खेळावा लागायचा. त्यावेळी ‘रेड बॉल’ क्रिकेटला प्रोत्साहन दिले जात आहे. आफ्रिदीच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक लीगमध्ये पैसा असतो. कारण गोष्टी व्यावसायिक स्तरावर खूप पुढे गेल्या आहेत. पैसा आहे आणि खेळाडू भरपूर कमावत आहेत. अशा परिस्थितीत, जर एखादा खेळाडू आपल्या राष्ट्रीय संघासाठी खेळू शकत नसेल तर तो जगातील विविध लीगमध्ये खेळून पैसे कमवू शकतो, जे आफ्रिदीच्या मते चांगली गोष्ट आहे.
देशासाठी खेळणे खूप मोठी गोष्ट –
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी म्हणाला की, देशासाठी खेळणे ही मोठी कामगिरी आहे. देशासाठी खेळण्याचा एक वेगळाच आनंद आहे. ज्या खेळाडूंना त्यांच्या राष्ट्रीय संघात संधी मिळत नाही, त्यांना लीगमध्ये संधी मिळते आणि त्यातही भरपूर पैसा असतो, असे आफ्रिदीचे म्हणणे आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबाला आधार देणे.
हेही वाचा – ICC T20 Bowling Ranking : जसप्रीत बुमराहने आयसीसी रँकिंगमध्ये मोठी झेप! टॉप-१० मध्ये जबरदस्त बदल
शाहिद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द –
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानकडून ९९ टी-२० सामने खेळताना १,४१६ धावा केल्या असून ९८ विकेट्सही घेतल्या आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या इतिहासाबद्दल सांगायचे तर, आफ्रिदी हा महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक राहिला आहे. त्याने ३९८ एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना ८,०६४ धावा आणि ३९५ विकेट्सही घेतल्या. त्याने आपल्या कारकिर्दीत केवळ २७ कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याच्या नावावर १,७१६ धावा आणि ४८ विकेट्स घेतल्या आहेत.