टी-२० विश्वचषक २०२२ च्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्ताने न्यूझीलंडवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली. त्यानंतर दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून पराभूत होऊन बाहेर पडावे लागले आणि इंग्लंडने अंतिम फेरीत प्रवेश केला.टीम इंडियासाठी बाद फेरीतील पराभवाची मालिक संपण्याचे नाव घेत नाही. प्रत्येक वेळी भारतीय संघाची इथे येऊन दमछाक होते. दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याच्या मते पाकिस्तानचा संघ या बाबतीत खूपच सरस ठरला आहे. दबाव हाताळण्याच्या बाबतीत पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा सरस असल्याचे त्याने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाची बाद फेरीतील कामगिरी चांगली नाही. त्याचबरोबर दिग्गज खेळाडूही उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत फ्लॉप ठरले आहेत. २०१४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत संघ पोहोचला होता, पण श्रीलंकेविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी, २०१५ च्या विश्वचषकात, संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला होता.

२०१६ च्या टी-२० विश्वचषकातही संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्येही त्यांना पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय २०१९ च्या विश्वचषक उपांत्य फेरीतही संघाचा पराभव झाला होता. २०२१ च्या टी-२० विश्वचषकातून संघ आधीच फेरीतून बाहेर पडला होता. आता २०२२ मध्येही संघाची अवस्था तशीच झाली आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2022: विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याने केली भावनिक पोस्ट, ‘या’ लोकांचे मानले आभार

भारतीय संघात पाकिस्तानसारखे गोलंदाज नाहीत – दानिश कनेरिया

दबावाखाली भारतीय संघ विस्कळीत होतो हे यावरून दिसून येते. दुसरीकडे, दानिश कनेरियाच्या मते, पाकिस्तानचा संघ दबाव हाताळण्यात अधिक पटाईत आहे. दानिश कनेरिया त्याच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, ‘भारतीय खेळाडू कोणत्याही प्रकारचे दडपण हाताळू शकत नाहीत. पाकिस्तानचा संघ या बाबतीत भारतापेक्षा खूपच सरस आहे. उपांत्य फेरीत भारताला प्रथम फलंदाजी करायची होती, तर त्यांच्याकडे पाकिस्तानप्रमाणे वेगवान आक्रमणे असायला हवे होते. मात्र, भारताकडे शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, शादाब खान आणि मोहम्मद नवाजसारखे गोलंदाज नाहीत.”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Danish kaneria says pakistan far better than india when comes to handling pressure t20 world cup 2022 vbm
Show comments