भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या आयसीसी टी२० विश्वचषकात अडचणींचा सामना करावा लागला. खेळाच्या मैदानातील अडचणी कमी झाल्या असून आता मैदानाबाहेरील अडचणींचा सामना करावा लागत आहे. फॉर्ममध्ये परतलेल्या या खेळाडूच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ कोणीतरी व्हायरल केला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विराट चांगलाच संतापला होता आणि संघ व्यवस्थापनाने याबाबत हॉटेल अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराटचा व्हिडीओ लीक झाल्याच्या घटनेबाबत सांगितले.
रविवारी पर्थमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. या सामन्यानंतर एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये विराट कोहलीची हॉटेलची रूम दाखवण्यात आली होती. खुद्द विराटने हा व्हिडिओ शेअर करून यावर नाराजी व्यक्त केली. भारतीय संघ पर्थ क्राउन रिसॉर्ट्समध्ये मुक्काम करत होता त्यावेळी हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने हा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, “हे खूप निराशाजनक आहे. या गोष्टी सगळ्यांसाठी इतक्या सोप्या नसतात, विराटला एकटे राहू द्या. याबाबत आम्ही अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांनीही याबाबत कार्यवाही केली आहे. मला आशा आहे की भविष्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही आणि लोक आता त्याबद्दल अधिक काळजी घेतील.”
हेही वाचा : बेबी एबीचे तुफानी शतक! टायटन्स संघाकडून फलंदाजी करताना केली विस्फोटक खेळी
“हे असे ठिकाण आहे (हॉटेल रूम) जिथे शिकारी नजरेआड आहेत आणि मीडियाच्या नजरेपासून दूर आहेत, तिथे छायाचित्रकार, पत्रकार नाहीत आणि इतर सर्व गोष्टी ज्यांना खेळाडूला सामोरे जावे लागते. जर हे स्वातंत्र्य तुमच्याकडून काढून घेतले जात असेल तर ही भावना चांगली नाही.” यावेळी द्रविड यांनी शिकारी हा शब्द माध्यमांसाठी वापरला असून शिकार म्हणजे खेळाडू असे त्यांनी प्रयोग केला आहे.