पाकिस्तान क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. मात्र, विजेतेपदाचा सामना जिंकणे त्याच्यासाठी सोपे जाणार नाही. पाकिस्तानने बुधवारी शेवटचा सामना खेळला, त्यानंतर संघाने विश्रांती घेतली आणि आता अंतिम फेरीसाठी तयारी केली आहे. मात्र, पाकिस्तानची तयारी पाहता इंग्लंडला हलक्यात घेण्याची चूक ते करत आहेत, असे आम्ही म्हणत नाही, असे चाहते सांगत आहेत. कारण पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान संघाचा गोलंदाज शाहीन आफ्रिदीला गोलंदाजी करताना दिसत आहेत.
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्याकडून चाहत्यांना सर्वाधिक अपेक्षा आहेत. बाबर जर इंग्लंड विरुद्ध आपल्या नेहमीच्या लयीत दिसला तर पाकिस्तानचा विजय निश्चित आहे, कारण त्याची आकडेवारी पाहिली तर इंग्लंडविरुद्ध बाबरची बॅट चांगलीच तळपते. पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझम याने आतंरराष्ट्रीय टी२० क्रिकेटचे आतापर्यंत ९८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सामने इंग्लंडविरुद्धच खेळले असून सर्वाधिक धावाही केल्या आहेत. तसेच सर्वाधिक सामने वेस्ट इंडिजविरुद्ध (१७) खेळले आहेत.
बाबरने इंग्लंड विरुद्ध १५ टी२० सामने खेळताना १४ डावांमध्ये ५०.९०च्या सरासरीने ५६० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नाबाद ११० राहिली आहे. त्याचबरोबर त्याने टी२० मध्ये इंग्लंडविरुद्ध एक शतक आणि ४ अर्धशतके केली आहेत. सर्वाधिक टी२० षटकारही त्याने इंग्लंडविरुद्धच खेचले आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत बाबरने ५० षटकार ठोकताना एकट्या इंग्लंडविरुद्ध १४ षटकार खेचले आहेत. तसेच त्याचा स्ट्राईक रेटही उत्तम राहिला. त्याने इंग्लंडविरुद्ध १४२.८५ च्या स्ट्राईक रेटने टी२० मध्ये धावा केल्या आहेत. तसेच तो कारकिर्दीत ५ वेळा शून्यावर बाद झाला असून या संघाविरुद्ध मात्र एकदाही शून्यावर तंबूत परतला नाही.
बाबर आणि रिझवान टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांच्या भागीदारीतही आघाडीवर आहेत. आतापर्यंत दोघांमध्ये ५१ डावांमध्ये २५०९ धावांची भागीदारी झाली आहे. त्याचबरोबर केएल राहुल आणि रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४१ डावांमध्ये १८८८ धावांची भागीदारी केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर रोहित आणि शिखर धवनची जोडी आहे. धवन आणि रोहित यांच्यात टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५२ डावांमध्ये १७४३ धावांची भागीदारी आहे. बाबर आणि रिझवान फायनलपूर्वी फॉर्ममध्ये परतले आहेत. दोघांमधील १०५ धावांच्या भागीदारीने सामना पाकिस्तानकडे वळवला. बाबरने आंतरराष्ट्रीय टी२० मधील २९वे अर्धशतक झळकावले. यानंतर रिझवाननेही या फॉरमॅटमधील २३वे अर्धशतकही झळकावले.