मागील जवळपास महिनाभरापासून ऑस्ट्रेलिया खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकाला अखेर नवा विजेता मिळाला. रविवारी (१३ नोव्हेंबर) मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला ५ गडी राखून पराभूत करत दुसऱ्यांदा विजेतेपद आपल्या नावे केले. सॅम करन व बेन स्टोक्स हे इंग्लंडच्या विजयाचे नायक ठरले. याच पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला, “इंग्लंड संघाचे अभिनंदन. प्रत्येकजण आम्हाला पाठिंबा देण्यासाठी येथे आल्यासारखे वाटले. तुमचे खूप खूप आभार. गेल्या चार सामन्यांमध्ये माझ्या संघाची कामगिरी अप्रतिम होती. मी खेळाडूंचे अभिनंदन केले. मी संघातील प्रत्येक खेळाडूला त्यांचा नैसर्गिक खेळ खेळायला सांगितलं होत. पण आम्हाला २० धावा कमी पडल्या, आमची गोलंदाजी जगातील सर्वोत्तम आक्रमणांपैकी एक आहे. दुर्दैवाने शाहीनच्या दुखापतीने आम्हाला सामन्यात रोखले, पण हा खेळाचा भाग आहे. मला माझ्या खेळाडूंवर आणि संघातील सर्व सहकार्याने हे शक्य झाले. माझ्या संघाचा मला अभिमान आहे.” असे तो शेवटी म्हणाला.
उल्लेखनीय म्हणजे, १३व्या षटकात हॅरी ब्रूकचा सोपा झेल घेतल्यानंतर आफ्रिदीने स्वत:ला दुखापत केली होती. त्याच्याकडे अजून दोन निर्णायक षटके टाकायची होती पण पाय दुखू लागल्याने तो गोलंदाजी करू शकला नाही आणि त्याने मैदान सोडले. यानंतर पाकिस्तानला त्यांच्या अर्धवेळ गोलंदाजांसह जावे लागले आणि हे त्यांना महागात पडले.
धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला पहिल्याच षटकात जबर धक्का बसला. मागील सामन्यात नाबाद अर्धशतक पूर्ण करणारा ऍलेक्स हेल्स शाहिन आफ्रिदीचा शिकार ठरला. चाचपडत खेळणारा फिल सॉल्ट केवळ दहा धावा करत बाद झाला. कर्णधार जोस बटलरने झटपट २६ धावा ठोकल्या. बटलर बाद झालं तेव्हा इंग्लंड संघ संकटात सापडला होता. मात्र, अनुभवी बेन स्टोक्सने हॅरी ब्रुकसह ३९ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. अडखळत खेळत असलेल्या स्टोक्सने खराब चेंडू मिळतात नवाझ याच्यावर हल्ला चढवत इंग्लंडच्या विजयाचे दरवाजे खुले केले. मोईन अलीनेही वसीमला तीन चौकार ठोकत पाकिस्तानला सामन्यातून बाहेर नेले. मोईनने १३ चेंडूवर १९ धावांचे योगदान दिले. स्टोक्सनेच आपले अर्धशतक पूर्ण करून संघासाठी विजयी धाव काढली.