टी२० वर्ल्डकप स्पर्धेत एकाक्षणी सुपर८ फेरीसाठी पात्र होणं खडतर झालेल्या इंग्लंडने अमेरिकेचा धुव्वा उडवत दिमाखात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडने झटपट गुंडाळलेल्या या सामन्यात अमेरिकेला ११५ धावाच करता आल्या. इंग्लंडने ९.४ षटकातच हे लक्ष्य पार करत गणितीय समीकरणांविना सेमी फायनलमध्ये स्थान पटकावलं. सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारा इंग्लंड पहिलाच संघ आहे. मूळ बार्बाडोसचा पण इंग्लंडकडून खेळणारा ख्रिस जॉर्डन या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने हॅट्ट्र्रिक घेत अमेरिकेच्या डावाला खिंडार पाडलं.
मार्क वूडच्या जागी संधी मिळालेल्या ख्रिस जॉर्डनने हॅट्ट्र्रिक घेण्याचा पराक्रम केला. जॉर्डन मूळचा बार्बाडोसचा. पण तो इंग्लंडसाठी खेळतो. मायदेशात कर्मभूमी असलेल्या इंग्लंडसाठी हॅट्ट्र्रिकचा विक्रम जॉर्डनने नावावर केला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अमेरिकेचा संघ एकाक्षणी १११/५ अशा स्थितीत होता. तिथून त्यांचा ११५लाच ऑलआऊट झाला. जॉर्डनने १७ चेंडूत अवघ्या १० धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स पटकावल्या. जॉर्डनने कोरे अँडरसन, अली खान, एनपी केनिंगे आणि सौरभ नेत्रावळकर यांना माघारी धाडलं. टी२० वर्ल्डकप स्पर्धेत हॅट्ट्र्रिक घेणारा जॉर्डन इंग्लंडचा पहिलाच गोलंदाज आहे. टी२० वर्ल्डकप स्पर्धेतली ही नववी हॅट्ट्र्रिक आहे. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्ट्किक घेतली होती. या वर्ल्डकप स्पर्धेतली ही तिसरी हॅट्ट्र्रिक आहे.
अमेरिकेने पाकिस्तानला नमवत आशा जागवली पण त्यानंतर मोठ्या संघांनी त्यांच्याविरुद्ध सहज विजय मिळवले आहेत. अमेरिकेतर्फे नितीश कुमारने ३० तर कोरे अँडरसनने २९ धावा केल्या. हरमीत सिंगने २१ धावा केल्या. आदिल रशीदच्या फिरकीचं कोडंही अमेरिकेला सोडवता आलं नाही. सॅम करन आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत जॉर्डनला चांगली साथ दिली.
या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलर- फिल सॉल्ट जोडीने अमेरिकेच्या आक्रमणाचा अक्षरक्ष: पालापाचोळा केला. दोन षटकं सावधपणे खेळून काढल्यावर बटलरने भात्यातली सगळी अस्त्रं परजली. हरमीत सिंगने टाकलेल्या नवव्या षटकात बटलरने ५ उत्तुंग षटकार लगावले. या षटकात त्याने ३२ धावा चोपून काढल्या. इंग्लंडने ५८ चेंडूत लक्ष्य पार केलं. बटलरने ३८ चेंडूत ६ चौकार ७ षटकारांसह नाबाद ८३ धावांची खेळी केली. सॉल्टने २१ चेंडूत २५ धावा करत त्याला चांगली साथ दिली.