Fan Prayers for Team India to win T20 WC 2024 : टी-२० विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना आज रात्री ८ वाजता टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळला जाईल. या सामन्याबाबत संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. काशी या धार्मिक नगरीत काशीच्या लोकांनी भारताच्या विजयासाठी ‘विजय यज्ञ’ केला. काशीमध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी लोकांनी आर्दली बाजार येथील ‘पांचोंवीर बाबा’ मंदिरात विजय यज्ञ केला आणि टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केली. आर्दली बाजार येथील ‘पांचोंवीर बाबा’ मंदिरात क्रिकेटप्रेमींनी हातात भारतीय खेळाडूंची छायाचित्रे घेऊन प्रार्थना केली. कर्णधार रोहित शर्माचा फोटो घेऊन अनेक चाहते सिद्धिविनायक मंदिरात प्रार्थना करण्यासाठी पोहोचले होते. ज्याचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.
एकाच वर्षात भारत तिसऱ्यांदा फायनलमध्ये दाखल –
गेल्या वर्षभरात ही तिसरी वेळ असेल, जेव्हा भारतीय संघ आयसीसी स्पर्धेच्या जेतेपदाच्या सामन्यात पोहोचला आहे. दोनदा भारतीय संघ इतिहास रचण्यात थोडक्यात मुकला आहे. या कालावधीतील सर्वात हृदयद्रावक पराभव हा एकदिवसीय विश्वचषक फायनलमधील होता, ज्यामध्ये फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाला फक्त एका वाईट दिवसामुळे ट्रॉफी जिंकता आली नाही. पण, यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पूर्वीपेक्षा चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे.
चाहत्यांमध्ये फायनलबद्दल प्रचंड उत्साह –
या सामन्याबद्दल भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. भक्तीच्या बळावर एका रोमांचक अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी काशीतील क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. यावेळी टीम इंडिया ट्रॉफीवर कब्जा करेल अशी त्यांना पूर्ण आशा आहे. स्थानिक क्रिकेट प्रेमी रमेश भादवन म्हणाले, ‘टी-२० विश्वचषक विजेतेपदाच्या सामन्यात टीम इंडियाला ऊर्जा आणि ताकद देण्यासाठी आम्ही हा ‘विजय यज्ञ’ केला. आमच्या खेळाडूंना आत्मविश्वास मिळावा, अशी आम्ही देवाकडे प्रार्थना केली आहे. आशा आहे की भारतीय संघ ट्रॉफी जिंकेल.’
हेही वाचा – IND vs ENG : आधी संघाला विजयी केले, मग जिंकले रितिकाचे मन, मैदानावर दिसले रोहित शर्माचे नवे रुप, पाहा VIDEO
टीम इंडियाच्या विजयासाठी ‘विजय यज्ञ’ –
स्थानिक राकेश चौबे (पंडित) म्हणाले, ‘सनातन धर्मानुसार विजय यज्ञ केल्याने प्रत्येक कार्यात यश मिळते. म्हणूनच आमच्या टीम इंडियाला यश मिळावे यासाठी आम्ही हा यज्ञ केला. खेळाडूंना बाबांचे आशीर्वाद नक्कीच मिळतील.’ टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन असे संघ आहेत, ज्यांनी आतापर्यंत एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली आहे. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत. ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने भारत मैदानात उतरणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेने सर्व फॉरमॅटमध्ये गेल्या सात विश्वचषक उपांत्य फेरीत पराभूत होऊन प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे.
हेही वाचा – IND vs SA : फायनल आणि राखीव दिवशीही पावसाचं सावट; सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार जेतेपदाचा करंडक?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड रेकॉर्ड –
टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर वरचष्मा राहिला आहे. या दोघांमध्ये एकूण २६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १४ आणि आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला. टी-२० विश्वचषकातही भारताचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व आहे. दोन्ही संघ ६ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यात भारताने चार सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने दोन सामने जिंकले आहेत.