टी २० वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये चित्तथरारक असा सामना झाला. या सामन्यात शेवट्या काही मिनिटामध्ये क्रिकेट चाहत्यांना खेळाचा थरार अनुभवता आला. यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला १२० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान विजयाच्या जवळ आला होता. मात्र, भारतीय संघांच्या फलंदाजांनी केलेल्या खेळीमुळे पाकिस्तानचा पराभव झाला आणि भारताने पाकिस्तानवर ६ धावांनी शानदार विजय मिळवला.
रविवारी रात्री ८ वाजता सुरू झालेला हा सामना मध्यरात्री संपला. ऋषभ पंतने साकारलेली ४२ धावांची खेळी, तीन भन्नाट झेल आणि जसप्रीत बुमराहने शिस्तबद्ध माऱ्यासह पटकावलेल्या ३ विकेट्स या विजयाचं वैशिष्ट्य ठरल्या. भारतीय संघाने विजयासाठी १२० धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, भारतीय संघाने शानदार बॉलिंग करत पाकिस्तानला २० ओव्हरमध्ये ११३ धावांवर रोखलं. त्यामुळे भारताने पाकिस्तानवर चित्तथरारक असा विजय मिळवला.
हेही वाचा : IND vs PAK: पाकिस्तानच्या पराभवाचं नेमकं कारण काय? बाबर आझम म्हणाला, “भारताविरुद्धच्या सामन्यात आम्ही…”
टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमधील हा अटीतटीचा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडला. हा सामना ज्या स्टेडियमवर झाला त्याविषयी चर्चा करताना भारताचे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनीही प्रतिक्रिया दिली. “अशा खेळपट्टीवर बाबर आझमसारख्या खेळाडूची फलंदाजी थांबते हे खरे आहे. तुम्हाला अशा खेळपट्टीवर सातत्य हवे असते. मात्र, ते सातत्य पाकिस्तानच्या संघामध्ये दिसत नाही.”, असं माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी म्हटलं.
कर्णधार बाबर आझम काय म्हणाला?
पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमने यावर प्रतिक्रिया देत या पराभवाचे कारण सांगितलं आहे. जास्त डॉट बॉल खेळल्यामुळे पराभव झाल्याचं कारण कर्णधार बाबर आझमने सांगितलं आहे. कर्णधार बाबर आझम म्हणाला, “आम्ही चांगली गोलंदाजी केली. पण फलंदाजी करत असताना आम्ही विकेट गमावल्या. त्यात अनेक डॉट बॉल खळलो. त्यामुळे आम्हाला विजयापर्यंत पोहतचा आले नाही. आम्ही सामान्यपणे खेळण्यासाठी डावपेच सोपे होते. स्ट्राइक रोटेशन आणि चौकार मारण्याची योजना होती. पण याचवेळी खूप डॉट बॉल्स खळलो, त्यामुळे विजयापर्यंत जाता आलं नाही. तसेच विकेट गेल्यामुळे चांगली कामगिरी करता आली नाही. यामध्ये शेवटच्या फलंदाजाकडून जास्त अपेक्षा ठेवता येत नाहीत”, अशी बाबर आझमने प्रतिक्रिया दिली